वर्धा : एम्स म्हणजे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था. वैद्यकीय विज्ञानातील सर्वोच्च केंद्रीय संस्था. विज्ञान म्हणजे तावून सुलाखून सिद्ध झालेला आविष्कार. अंदाजाला थारा नाहीच. तिथे आता पारंपरिक चिकित्सा प्रवेश करणार. केंद्र व राज्य पातळीवर पारंपरिक उपचार पद्धतीस प्राधान्य देणारे सत्ताधारी. त्यामुळेच आयुष हे भारतीय चिकित्सा पद्धतीस पुरस्कृत करणारे स्वतंत्र मंत्रालय २०१४ साली स्थापन करण्यात आले. ही पारंपरिक औषधी प्रणाली उपयुक्त म्हणून विविध उपक्रम सूरू झालेत.
त्याच अनुषंगाने एम्स संस्थेत गोमय पदार्थापासून तयार औषधी पुरुस्कृत होत आहे. देवलापार येथील गो – विज्ञान अनुसंधान केंद्राने यात पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सदस्य सनतकुमार गुप्ता यांनी त्याची वाच्यता केली. येथील आशिष गोस्वामी संचालित करुणाश्रम या अनाथ पशु आश्रमात आयोजित एका कार्यक्रमात गुप्ता आले होते. याठिकाणी गोसेवा शेडचे उदघाटन व इको पार्कचे भूमिपूजन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते झाले. पाहुणे म्हणून बोलतांना गुप्ता यांनी गायीचे महत्व अधोरेखित केले.
गाईच्या पाठीवरून सात वेळा हात फिरविला तर ब्लड प्रेशर कमी होत असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच आमची गोमय औषधी आता एम्सने मान्य केल्याचे ते म्हणाले. गो विज्ञान अनुसंधान केंद्राच्या पंचतिक्त ग्रुथ आणि लघु शेखर या बुटी द्वारे उपचार करण्यास एम्सने मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेच्या उच्चस्तरीय समितीने याबाबत बोलणी केली. या दोन बुटी मार्फत डोकं ते मानेपर्यंत होणाऱ्या कर्करोगवार उपचार केल्या जातील. नागपूर एम्सच्या डॉ. गायत्री मुथीयन या तर गोमूत्र संशोधन करीत असल्याचे गुप्ता म्हणाले.
तसेच नागपूर येथील विख्यात सिम्स या रुग्णालयातील डॉ. रामपालसिंग कश्यप हे गोमूत्रपासून ब्रेन ट्यूमरचे उपचार करतात. सध्या नागपूर एम्स येथेच आमची औषधी उपयोगात येणार. उर्वरित पुढेच ठरणार, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले. महाराष्ट शासन हे गोसेवेस कटीबद्ध आहे. शासनाने लाडक्या बहिणीसाठी १५०० रुपये मदत देण्याची योजना राबविली. आता एका गायीसाठी रोज ५० रुपये म्हणजेच मासिक १५०० रुपये लाडक्या बहिणीप्रमाणेच गोमाता सेवेसाठी मिळणार, असे गुप्ता स्मितहास्य देत म्हणाले. राज्यातील सर्व गोशाळा आता सक्षम होतील, अदा विश्वास त्यांनी व्यक्त केला.