वर्धा : केंद्रीय ‘आयुष’ राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या आयुर्वेद महाविद्यालयास नियमभंग केल्याची नोटीस त्यांच्याच खात्याने पाठवली आहे. जाधव यांनी स्थापन केलेल्या संस्थेमार्फत बुलढाणा जिल्ह्यात मेहकर येथे राजश्री आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालय संचालित केले जाते. ते मंत्री झाल्याने आता त्यांचे पुत्र ऋषी प्रतापराव जाधव हे संस्थेचे अध्यक्ष आहेत.

आयोगाच्या वैद्याकीय मूल्यांकन व मानक मंडळाने देशातील आयुष पुरस्कृत सर्व महाविद्यालयांना बायोमेट्रिक हजेरी व्यवस्था लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. केवळ कागदोपत्री हजेरी दाखवणाऱ्यांना वचक बसावा, असा यामागचा हेतू आहे. ही यंत्रणा कार्यान्वित करण्याची मुदत आधी ८ ते २८ जानेवारी होती. नंतर ती १८ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली. मात्र तरीही महाविद्यालयाकडून निर्देश पाळण्यात टाळाटाळ झाली. म्हणून आयोगाने महाविद्यालयास नोटीस बजावली. देशात सातशेवर आयुर्वेद व अन्य भारतीय चिकित्सा पद्धतीची महाविद्यालये आहेत. यातील ७२ महाविद्यालयांनी ही पद्धत वारंवार सूचना देऊनही अमलात आणलेली नाही. त्यामुळे ही नोटीस पाठवण्यात आली.

राजश्री आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सोनल लोहिया राठी यांनी नोटीस मिळाल्याची बाब मान्य केली. आयोगाने यापूर्वी आमच्या महाविद्यालयांस सूचित केले होते, पण आरोग्य शिबिरे व अन्य कामांमुळे बायोमेट्रिक प्रणालीचा विषय मागे पडला. मात्र प्रक्रिया सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले.

आयोगाने नमूद केलेलीच प्रणाली लावायची असल्याने विलंब झाला. पण आता सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या खात्याचे मंत्रीपद माझ्या वडिलांकडे आताच आले. मंत्रालय मात्र १० वर्षांपासून कार्यरत आहे. मंत्रालयाकडून त्यांच्या कार्यप्रणालीची अंमलबजावणी सुरूच असते. आमचे सर्व काम नियमानुसार आहे. ऋषी प्रतापराव जाधव अध्यक्ष, स्व. धर्मवीर दिलीपराव रहाटे शैक्षणिक व बहू. संस्था

Story img Loader