बुलढाणा : दारू सोडविण्याच्या नावावर एका इसमास अमानुष मारहाण करणाऱ्या कथित बाबाचा व्हिडिओ समाज माध्यमावर वेगाने सार्वत्रिक झाला होता आहे. या बाबाविरूद्ध रायपुर पोलिसांनी शनिवारी (दिनांक २९) संध्याकाळी उशिरा गुन्हे दाखल केले आहे. शिवाजी बरडे उर्फ शिवा महाराज असे आरोपीचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सार्वत्रिक चित्रफीत आणि प्रसिद्धी माध्यमातील वृत्ताची पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी बुलढाणा तालुक्यातील रायपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार दुर्गेशसिंग राजपूत यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी ‘व्हिडीओ’ मधील अमानुष मारहाण होणाऱ्या इसमाची ओळख पटविली. अमानुष मार सहन करणारा इसमाचे नाव राजेश श्रीराम राठोड ( वय ३६) असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच तो जालना जिल्ह्यातील माळेगाव (तालुका मंठा) येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. शनिवारी ( दिनांक २९) संध्याकाळी राजेश राठोड याने रायपूर पोलीस ठाण्यात प्रकरणाची रीतसर तक्रार दिली . प्रकरणी रायपूर पोलिसांनी आरोपी शिवाजी बरडे उर्फ शिवा महाराज ( राहणार घाटनांद्रा शिवार, तालुका बुलढाणा) याच्या विरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३२४, ३२३ आणि २९४ नुसार गुन्हे दाखल केले आहे.

हेही वाचा…आनंदवन हत्या प्रकरणातील आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या

काय होते व्हिडीओ मध्ये?

एक महाराज दारू सोडविण्याच्या नावाखाली उपचार म्हणून व्यसनी इसमास अमानुषपणे मारहाण करीत असल्याचा एक व्हीडिओ समाज माध्यमावर २४ जून रोजी ‘व्हायरल’ झाला होता. ही घटना बुलडाणा तालुक्यातील घाटनांद्रा येथील असल्याचे निष्पन्न झाले होते. या गावानजीक जंगल परिसरात या कथित बुवाचा आश्रम आहे. या ठिकाणी ते दारू सोडविण्यासाठी उपचार करतात.त्यांच्याकडे आलेल्या एका व्यक्तीला उपाचाराच्या नावाखाली तो अमानुषपणे बेदम मारहाण करीत असल्याचे ‘व्हिडिओ’ मध्ये दिसत होते. अगरबत्ती, धुपचा धूर, समोर बसलेल्या (राजेश राठोड) अमानुष मारहाण करणारी व्यक्ती, त्याच्या मागे ही मारहाण मौनपणे सहन करीत बसलेले सोयरे, श्रद्धावान (?) विनम्र भक्तमंडळी असे चित्रफीत मधील चीड आणणारे दृश्य होती.’दारू सोड, दारू सोड’… म्हणत भोंदूबाबा त्या युवकाला बेदम मारहाण करत होता.

एका मंदिरवजा आश्रमात गळ्यात हार घालून बसलेला हा भोंदूबाबा दारू सोडविण्याच्या नावाखाली मारहाण करत असल्याचे दिसते. दणकट शरीराच्या, तगड्या तुगड्या भोंदू बाबाच्या बेदम मारहाणीने उपचारासाठी बसलेली व्यक्ती चांगलीच ‘घायाळ’ झाल्याचे दिसून येत होते. त्यामुळे तो बाबाच्या तडाख्यातून वाचण्याची कोविलवाणी धडपड करतो, मात्र अनेकदा ते प्रयत्न असफल ठरतात. एकदा ‘तो’ सफल ठरतो तर सोबतची एक व्यक्ति त्याला पुन्हा बाबाच्या स्वाधिन करतो. यामुळे संतापलेला बाबा त्याला पुन्हा धु धु धुवून काढतो. तो बिचारा बाबाचे पाय पडून विनवणी करतो, पण निर्दयी बाबाला तरी दया येत नाही.त्याची मारहाण सुरूच राहते, असे चित्रफीत मध्ये दिसत होते. सुमारे दीड मिनिटाच्या या चित्रफितीतील हा सर्व प्रकार अमानुषतेचा कळस गाठणारा अन अंधश्रद्धा चा कळस होता. दरम्यान फेसबुक वर देखील हा मारहाणीचा व्हिडीओ धुमाकूळ घालत राहिला. त्यावर नेटीझन्स आपापल्या पद्धतीने संतप्त प्रतिक्रिया देत होते.

हेही वाचा…शिष्यवृत्तीला विद्यार्थी मुकल्यास महाविद्यालय जबाबदार, काय आहेत शासनाच्या सूचना

दरम्यान हा व्हिडीओ सायबर पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी सांगितले होते.
या प्रकरणाची पडताळणी केल्यावर , व्यक्तीची ओळख पटल्यावर चौकशीअंती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.