नागपूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एकीकडे जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर दबाव निर्माण केला असताना व त्याखाली सरकार झुकत आहे, असे चित्र निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष व विदर्भातील ओबीसी नेते बबनराव तायवाडे हे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. त्यांनी शनिवारी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तर मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. सरकारने ओबीसींना दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करावी, अशी मागणी केली.
सात डिसेंबरपासून नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यात मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे. त्याच धर्तीवर ओबीसींच्या प्रश्नांवर चर्चा करावी, अशी मागणी केली जात आहे. सध्या सरकार एका समाजाची बाजू घेत असल्याचे चित्र आहे ते या चर्चेमुळे दूर होईल, असे याबाबत बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर तायवाडे यांनी फडणवीस आणि शिंदे यांची घेतलेली भेट महत्वाची मानली जाते.
हेही वाचा – यूजीसी नेट परीक्षा ६ डिसेंबरपासून, ‘एनटीए’कडून वेळापत्रक जाहीर
हेही वाचा – नागपूर : तिकीट नसल्याने युवकाची धावत्या रेल्वेतून उडी
तायवाडे काय म्हणाले ?
ओबीसींच्या प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करू असे आश्वासन २९ सप्टेंबरला शासनाने दिले होते. त्याची पूर्तता झाली नाही, याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधले. तसेच नागपूर अधिवेशनात मराठा आरक्षणाप्रमाणेच ओबीसींच्या मुद्यावरही चर्चा करा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली, असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सांगितले.