नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राचे (कन्वेंशन सेंटर) काम अंतिम टप्प्यात आहे. १४ एप्रिलला याचे लोकार्पण करण्याची तयारी शासनाची आहे. त्या दृष्टिकोनातून येत्या १५ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश समाज कल्याण उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड यांनी अधिकारी व कंत्राटदारांना दिले.
कामठी रोडवर नासुप्रच्या ७५०० चौरस मीटर जमिनीवर हा प्रकल्प साकारला जात आहे. विदर्भ विकास कार्यक्रमांतर्गत २००९ मध्ये हा प्रकल्प समाविष्ट करण्यात आला. सुरुवातीला २२ कोटींचा हा प्रकल्प होता. परंतु, नंतर आंतरराष्ट्रीय दर्जाचे कन्वेंशन सेंटर तयार करण्याचा निर्णय शासनाने घेतला. आतापर्यंत ११३.७४ कोटी रुपये खर्च झाले असून आणखी १४ कोटी ९५ लाखांच्या खर्चास मंजुरी मिळाली आहे. हा निधी लवकरच नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांना वळता करण्यात येणार आहे.
मंगळवारी उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी या केंद्राची पाहणी केली. त्यात त्यांना किरकोळ त्रुटी आढळून आल्या. या त्रुटी दूर करून १५ मार्चपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. केंद्राची इमारत संसद भवन प्रमाणे आहे. त्यात २०० लोकांच्या क्षमतेची आंतरराष्ट्रीय दर्जाची ई-लायब्ररी, कलावंतांसाठी एक आर्ट गॅलरी, संशोधक केंद्र आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्राची माहिती असणार आहे. कन्वेंशन सेंटरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ४० फूट उंच ब्रांझचा पुतळा लावण्यात येणार आहे. रस्त्यावरूनही हा पुतळा लोकांना पाहता येणार आहे. पुतळ्यावर ५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.