अकोला : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला अकोल्यात सोमवारी रात्री गालबोट लागले. शहरातील वाशीम बायपास परिसरात किरकोळ कारणावरून दोन गटात वाद निर्माण झाला. त्या वादातून दोन्ही गटाकडून परस्पर दगडफेक करण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता अकोला पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. सौम्य बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या परिसरात शांतता असून जनजीवन सुरळीत झाले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी देशभरात उत्साहाचे वातावरण होते. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आली. अकोला शहरासह जिल्ह्यात देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरात सर्वत्र शांततेत व उत्साहात कार्यक्रम सुरू होते. दरम्यान, शहरातील वाशीम बायपास चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात एका असामाजिक तत्त्वाच्या गटाने वाद घातला. या वादातून एका दुचाकीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. या विरोधात दुसरा गट देखील समोर आला. त्यांनी प्रत्युत्तरात समोरच्या गटावर दगडफेक केली. दोन गटातील वादातून परस्परविरोधी दगडफेकीच्या घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली.
घटनेचे गांभीर्य ओळखता मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळावर दाखल झाला. शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी आपल्या ताफ्यासह घटनास्थळावर पोहोचले. दगडफेक करणाऱ्या असामाजिक तत्त्वांवर आळा बसण्यासाठी पोलिसांनी बळाचा सौम्य वापर केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थितीवर तात्काळ नियंत्रण मिळवले. पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली आहे. घटनास्थळावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या परिस्थिती संपूर्णत: नियंत्रणात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन अकोला पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था बाधित करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील पोलिसांनी दिला आहे.
शहरातील वाशीम बायपास हा अत्यंत संवेदनशील परिसर म्हणून ओळखला जातो. सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात सुरू असताना काही असमाजिक तत्त्वांनी वाद निर्माण केला होता. पोलिसांनी सतर्कता राखत वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे.