नागपूर: पावसाळ्यात व्याघ्र पर्यटनाची चाके थांबतात, पण ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील निमढेला बफर क्षेत्रात ही चाके थांबली नाही तर आणखी वेगाने धावताहेत. त्याला कारणही तसेच. बदमाश “बबली”च्या बदमाश बछड्यांनी मान्सून जणू पूर्णपणे “एन्जॉय” करायचं ठरवलंय. पावसाळ्यातील त्यांची ही मस्ती वन्यजीवप्रेमी अरविंद बंडा यांनी कॅमेऱ्यात अगदी लिलया टिपली आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील निमढेला बफर क्षेत्र म्हणजे भानुसखिंडी, छोटा मटका, बबली या वाघांचा अधिवास. पर्यटकांना सहज दिसणे, पर्यटकांना जणू मुद्दाम आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या हरकती करणे, यामुळे हे बफरक्षेत्र पर्यटकांची पहिली पसंती ठरत आहे. हे वाघ आणि त्यांची वंशावळ येथे स्थिरावतेय ते या बफरक्षेत्रातील उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे आणि उत्कृष्ट व्यवस्थापनाचे सर्व श्रेय जाते ते नीमढेलाच्या सर्व वनरक्षकांना.
हेही वाचा… संभाजी भिडेंच्या नागपूर दौऱ्याला वंचितचा विरोध, आंदोलन करणार
एवढ्या वाघांची मूव्हमेंट, पर्यटकांचा ओढा असतानाही व्यवस्थापन चोख आहे. पावसाळ्यात येथील नदीनाले दुथडीभरून वाहत आहेत. जिथे पर्यटक अशा पावसाळी वातावरणाचा मनसोक्त आनंद घेतात, तिथे आपल्याच अधिवासात मनसोक्त आनंद घेण्यापासून वाघांची ही वंशावळ कशी मागे राहणार! “बबली”च्या बछड्यानी जणू हा पावसाळा मनसोक्त एन्जॉय करायचे ठरवलेय. कधी ते या पाण्यातून धावत सुटताय, तर कधी एकमेकांच्या अंगावर पडून मस्ती करताहेत आणि अरविंद बंडा यांनी हे क्षण कॅमेऱ्यात कैद केले आहेत, जे पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहेत.