भंडारा : खोट्या कागदपत्रांच्या आधारे बाळ दत्तक देण्याच्या नावाखाली बाळाची विक्री प्रकरणाचे धागेदोरे भंडारापर्यंत पोहोचले आहे. याप्रकरणी नागपुरात अटक असलेल्या दाम्पत्यासह चौघांवर भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचबरोबर, मूल विकत घेणाऱ्या भंडारा येथील महिलेला अटक करण्यात आली असून तिचा पती पसार झाला आहे. कळमना पोलिसांच्या तपासात हा प्रकार उघडकीस आला होता. सध्या या बाळाला भंडारा बालोदय येथे ठेवण्यात आले आहे.
योगेंद्रकुमार प्रजापती (३०), रिता योगेंद्रकुमार प्रजापती (२९) दोघे रा. राजस्थान, असे कळमना पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह इंदू सुरेंद्र मेश्राम (३५), सुरेंद्र तुळशीराम मेश्राम रा. छत्तीसगढ यांच्याविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून इंदूला अटक करण्यात आली आहे. नागपूर येथील कळमना पोलीस ठाण्यांतर्गत लहान बाळ विक्रीचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यात योगेंद्र आणि रिता या दोघांना अटक करण्यात आली.
त्यांनी दिलेल्या माहितीवरून भंडारा तालुक्यातील आंबाडी, गिरोला परिसरात वास्तव्यास असताना येथेही एका मुलाची विक्री केल्याची माहिती उघड झाली. त्यावरून कळमना पोलिसांनी भंडारा पोलीस ठाण्यात याप्रकरणाची कागदपत्रे पाठविली. यानंतर पोलिसांनी चौघांविरोधात भादवी ४६४, ४६५, ३७० आणि ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.