अमरावती : खासदार नवनीत राणा यांनी प्रचाराला सुरुवात केली असली, तरी महायुतीतील घटक पक्षांकडून त्‍यांना प्रतिसाद मिळण्‍यात अडचणी निर्माण होत आहेत. महायुतीतील सर्व घटक पक्षांतील नेत्‍यांना नवनीत राणा यांचा प्रचार करावाच लागेल, त्‍यांना एका मंचावर यावेच लागेल, असे वक्‍तव्‍य आमदार रवी राणा यांनी केले होते. रवी राणांच्‍या या वक्‍तव्‍याचा आमदार बच्‍चू कडू यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍यापेक्षा रवी राणांना घाबरतो, असे सांगून बच्‍चू कडू यांनी राणांच्‍या वक्‍तव्‍याची खिल्‍ली उडवली आहे. बच्‍चू कडू आपल्‍या खास शैलीत प्रसार माध्‍यमांशी बोलताना म्‍हणाले, रवी राणांनी दम दिला आहे. त्‍यांना घाबरावेच लागेल. खूप भीतीचे वातावरण तयार झाले आहे. मला मंचावर उपस्थित रहावेच लागेल. मला अनेक कार्यकर्त्‍यांचे फोन आले. उद्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. चौकशी लागू शकते. देवेंद्र फडणवीस यांना भेटून आल्यानंतर ते जोरजोराने बोलतात. त्यामुळे आम्हाला भीती आहे. आम्ही घाबरलो असल्याने आमची इच्छा नसली तरी आम्हाला मंचावर जावे लागेल, प्रचार करावा लागेल. खूप कठीण झाले आहे, असा खोचक टोला बच्चू कडू यांनी लागवला.

हेही वाचा >>> आनंदवार्ता ! राज्यातील २८० पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नती;  -काहीजण मॅटमध्ये जाणार, जाणून घ्या सविस्तर…

महायुतीतील नेतेही नवनीत राणा यांचा प्रचार करतील आणि एकाच मंचावर दिसतील. जे लोक महायुतीच्‍या धर्माचे पालन करणार नाहीत त्यांच्या कारवाई करायला लावू. कुणी विरोधात जाऊन प्रचार करत असेल तर त्याच्यावर कारवाई होईल, असे वक्‍तव्‍य रवी राणा यांनी युवा स्‍वाभिमान पक्षाच्‍या कार्यकर्त्‍यांच्‍या मेळाव्‍यानंतर केले होते.

आमदार बच्‍चू कडू यांचा प्रहार जनशक्‍ती पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष असला, तरी ते गेल्‍या अनेक दिवसांपासून सरकारच्‍या विरोधात भूमिका घेताना  दिसत आहेत. आपण स्‍वतंत्र आहोत, प्रहारची भूमिका लवकरच जाहीर करू, आम्‍ही केवळ शेतकरी, सर्वसामान्‍यांशी बांधील आहोत. इतर कुणाचेही आमच्‍यावर नियंत्रण नाही, असे त्‍यांचे म्‍हणणे आहे.

हेही वाचा >>> न्यायदानासाठी रात्री नऊ वाजता उघडले न्यायालयाचे दार, प्रकरण काय? वाचा…

एखादा खासदार जर शेतकरी, सर्वसामान्‍यांची बाजू संसदेत मांडत नसेल, तर त्‍याला नाकारण्‍याचा अधिकार हा जनतेला आहे, असेही त्‍यांनी सांगितले. बच्‍चू कडू हे राणा दाम्‍पत्‍याच्‍या विरोधात भूमिका घेऊन आहेत, दुसरीकडे महायुतीतील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ आणि अभिजीत अडसूळ यांनीही राणांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. रवी राणा यांच्या धमक्यांना अजिबात भीक घालत नाही. राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची भाजपबरोबर युती नव्हती. युती  शिवसेनेसोबत होती. आमचे संबंध वेगळे आहेत. राणांच्या अशा विधानांमुळे भाजप आणि सेनेतील संबंध बिघडण्‍याचा धोका आहे, त्‍यामुळे भाजपच्‍या वरिष्‍ठ नेत्‍यांनी याकडे लक्ष देऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अभिजित अडसूळ यांनी केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bacchu kadu criticized ravi rana by taking devendra fadnavis and eknath shinde name mma 73 zws
Show comments