अमरावती : प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी आज सपत्निक मतदानाचा हक्क बजावला. बच्चू कडू यांनी ११५ वेळा रक्तदान केले आहे. काल त्यांनी रक्तदान करून आज सकाळी मतदानाचा अधिकार बजावला. लोकसभा निवडणुकीच्या मतदानातून क्रांती घडेल, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला. बच्चू कडू म्हणाले, लोकशाहीची हत्या होऊ नये, अशी सर्वांची अपेक्षा आहे. शेतमालाला योग्य भाव मिळावा, गरिबांना पक्की घरे मिळावीत, विद्यार्थ्यांचे पेपर फुटू नयेते, योग्य उमेदवारांना नोकरी मिळावी, या आशेतून लोकांनी मतदान केले आहे.
गेल्या वीस वर्षांपासून आम्ही शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांसाठी लढा देत आहोत. ही कष्टकरी सर्वसामान्यांची लढाई आहे. यात आम्ही यशस्वी होऊ, असे बच्चू कडू म्हणाले.ही निवडणूक निश्चितच शेतकरी, शेतमजूर आम्हाला जिंकून दिल्याशिवाय राहणार नाहीत.
हेही वाचा >>> वाशीम जिल्ह्यात सकाळी मतदान संथगतीने
आजच्या मतदानामुळे देशात क्रांती घडेल. जाती-धर्माच्या नावावर नाही, तर शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांवरची आगळीवेगळी निवडणूक ठरेल, असे बच्चू कडू म्हणाले. बच्चू कडू यांनी महायुतीचे घटक असूनही अमरावती लोकसभा मतदार संघातून प्रहार जनशक्ती पक्षाची उमेदवारी दिनेश बुब यांना देत संघर्ष उभा केला. त्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरली. प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारासाठी आरक्षित करण्यात आलेले मैदान गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेसाठी सुरक्षेच्या कारणावरून नाकारण्यात आल्यानंतर बच्चू कडू आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. त्याची चर्चा महाराष्ट्रभर झाली.