भटक्‍या कुत्र्यांना आसाममध्‍ये पाठविण्‍याविषयी आमदार बच्‍चू कडू यांनी केलेल्‍या वादग्रस्‍त वक्‍तव्‍याचे तीव्र पडसाद उमटल्‍यानंतर अखेर बच्‍चू कडू यांनी आसामच्‍या जनतेची माफी मागितली आहे.बच्‍चू कडू यांच्‍या वक्‍तव्‍यावर नाराजी व्‍यक्‍त करीत आसामचे मुख्‍यमंत्री हिमांत बिस्‍वा सरमा यांनी राज्‍याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले. बच्‍चू कडू यांनी आपले वक्‍तव्‍य मागे घ्‍यावे, अशी मागणी सरमा यांनी केली आहे. आसामच्या लोकांबद्दल बच्‍चू कडू यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अतीव दुःख झाले असून आसामच्या संस्कृतीबद्दल त्‍यांनी आपले अज्ञान दाखवले आहे. त्यामुळे तुम्ही आसामच्या लोकांच्या भावनांचा आदर ठेवाल, अशी आशा असल्याचेही त्यांनी या पत्रामध्ये म्हटले आहे.

हेही वाचा >>>बुलढाणा: शेगाव ‘पं.स.’चे माजी उपसभापती पुंडलिक पारस्कर यांची आत्महत्या

बच्चू कडू यांनी आसाम राज्याबद्दल गेल्‍या आठवड्यात एक वादग्रस्त विधान केले होते. विधानसभेत भटक्या कुत्र्यांबद्दल बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील सर्व भटके कुत्रे आसाममध्ये पाठवा, तिथे त्यांना किंमत आहे. आसाममधील लोक कुत्र्यांचे मांस खातात. आपण जसा बोकड खातो, तसे तिकडचे लोक श्वानाचे मांस खातात, असे वक्तव्य त्‍यांनी केले होते.

हेही वाचा >>>महाविकास आघाडी, युवा ग्रॅज्युएट दोन जागांवर विजयी; नागपूर विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत मतविभाजनाचा फटका

बच्चू कडू यांच्या विधानानंतर आसाममधील सामान्य नागरिकांनी या वक्तव्याविरोधात नाराजी व्यक्त केली. तसेच या वक्तव्या विरोधात आसामच्या विधानसभेत देखील गोंधळ पहायला मिळाला. हा वाद आणखी वाढला आणि आसामच्‍या मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले.बच्‍चू कडू यांनी यासंदर्भात दिलगिरी व्‍यक्‍त करताना सांगितले की, आपण आसामचा सहजपणे उल्‍लेख केला होता. तेथील नागरिकांच्‍या भावना दुखावण्‍याचा आपला कोणताही हेतू नव्‍हता. चूक झाली असेल, तर माफी मागितलीच पाहिजे. भटक्‍या कुत्र्यांबद्दल आपण विधानसभेत केलेल्‍या वक्‍तव्‍याविषयी दिलगिरी व्‍यक्‍त करतो, असे बच्‍चू कडू यांनी सांगितले आहे.