अमरावती : “राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामील झाल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्ये साहजिकच नाराजी राहणार आहे. आपण राष्ट्रवादीला कंटाळून भाजपकडे गेलो होतो, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आम्हाला काम करू देत नाही, असाच सूर होता. आता भाजपने राष्ट्रवादीला जवळ केल्याने भाजपला साथ देणे चुकीचे ठरल्याची भावना या आमदारांची झाली आहे,” अशा शब्दात प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, ” नव्या घडामोडींमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या ४० आमदारांची मोठी गोची झाली आहे. या आमदारांची दोन्ही बाजूने कोंडी झाली आहे. वर्षभरापुर्वी राष्ट्रवादीला कंटाळून आपण भाजपला पाठिंबा दिला होता. आता अजित पवार हे पुन्हा निधी खेचून घेतील, आमच्या निर्णयात आडवे येतील अशी भीती आहे. त्यामुळे या आमदारांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.” बच्चू कडू म्हणाले, ” आम्ही सरकारमधील घटक पक्ष आहोत, राष्ट्रवादीला सोबत घेण्यापुर्वी किमान आमच्यासोबत चर्चा करायला हवी होती. पण तसे झाली नाही. भाजपला सरकारमध्ये समर्थकांची संख्या वाढवायची आहे, ते त्यांनी जरूर करावे, पण जुन्या लोकांचाही विश्वासघात होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. अन्यथा भविष्यात त्याचे परिणाम दिसून येतील.”
हेही वाचा >>>“मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहतील”, बावनकुळेंनी केले स्पष्ट; म्हणाले, “राष्ट्रवादीमुळे भाजपात अस्वस्थता नाही”
भाजपवर टीका करताना बच्चू कडू म्हणाले, ” भाजपला पक्ष मजबूत करायचा आहे, पण सोबत आलेले लोक खड्ड्यात गेले, तरी चालतील, हा त्यांचा विचार चुकीचा आहे. उलट यामुळे भाजपचेच जास्त नुकसान होणार आहे. दुसऱ्या लोकांना सोबत घेताना पहिल्या लोकांना खड्ड्यात टाकायचे, ही भूमिका राजकारणात टिकत नाही. मुख्यमंत्र्यांनी ४० आमदारांची समजूत काढली असली, तरी हा तात्पुरता उपचार आहे, एकदा मनात शंका निर्माण झाली, की ती दूर व्हायला वेळ लागत असतो,” असे बच्चू कडू म्हणाले.