लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अमरावती : विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्याआधी मुंबईत वेगवान घडामोडी पहायला मिळाल्या. परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीचे प्रमुख नेते आमदार बच्चू कडू मंगळवारी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पोहचले. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ, संजय शिरसाट आदी उपस्थित होते. यावेळी बच्चू कडू यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे.
दुसरीकडे, आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या अचलपूर मतदारसंघातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पाची कामे मार्गी लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. इतरही विकास कामांबाबत चर्चा झाली. बच्चू कडू यांनी त्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, असे त्यांच्या निकटच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, यासंदर्भात बच्चू कडू यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांचा मोबाईल संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचा संदेश प्राप्त झाला. त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही.
आणखी वाचा-तुमच्या मुलाला इंग्रजी शाळेत प्रवेश घ्यायचा आहे, बघा नामवंत शाळांचे शुल्क किती आहे?
तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून वेगळी चूल मांडलेल्या बच्चू कडू यांना पुन्हा सोबत घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी त्यांची समजूत काढल्याची चर्चा सुरू झाल्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. बच्चू कडू यांनी गेल्याच महिन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या सहकार्याने परिवर्तन महाशक्तीची घोषणा केली होती. तिसऱ्या आघाडीच्या रुपात आपण मतदारांना पर्याय देणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
बच्चू कडू यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. पण त्यानंतर राज्यात सत्तांतराच्या वेळी शिवसेनेच्या ४० आमदारांसह काही अपक्षांनी साथ दिली. त्यात बच्चू कडूंच्या प्रहारनेही शिंदेंना पाठिंबा दिला. त्यानंतर शिंदे मुख्यमंत्री झाले. पण त्यांच्या सरकारमध्ये कडू यांना मंत्रीपद देण्यात आले नाही. त्यांना केवळ दिव्यांग कल्याण मंडळाची जबाबदारी दिली गेली. यामुळे बच्चू कडू शिवसेनेवर नाराज होते. या नाराजीतूनच बच्चू कडू यांनी परिवर्तन महाशक्तीच्या रुपात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आणखी वाचा-नैऋत्य मोसमी पावसाची विदर्भातून पूर्णपणे माघार
दुसरीकडे, प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांनी शिंदे गटात सहभागी होण्याची घोषणा केली आहे. त्यामुळेही बच्चू कडूंचा शिवसेनेवरील रोष वाढल्याची चर्चा आहे. त्यातच निवडणुकीची तारीख घोषित होण्याआधी कडू यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात बच्चू कडू नेमकी कोणती भूमिका घेणार? काही वेगळा निर्णय घेणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे.