अमरावती : दिव्यांगांच्या सर्वांगिण विकासाठी मंत्रालयाचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. पदावर राहून हे काम होणार, ही शक्यता मला मावळताना दिसत आहे. दिव्यांगांसोबत बेईमानी करणे मला शक्य होणार नाही, असे सांगत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक माजी आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनाम्याचे पत्र पाठविताना भारतातले पहिले दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात निर्माण केल्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. परंतु अद्याप  दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रालयाचे काम सुरू झाले नाही. या विभागाच्या अध्यक्षपदावर राहून हे काम होणार, अशी शक्यता मला  दिसत नाही. दिव्यांगासोबत बेईमानी मला शक्य नाही. त्यामुळे माझा दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान, अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. तो मंजूर करुन सहकार्य करावे, तसेच मला असलेली सुरक्षा सुध्दा काढून टाकावी, असेही पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा >>>मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय, पारंपरिक स्वागत, पोलीस मानवंदना बंद

राज्यात दिव्यांग मंत्रालय निर्माण झाले, पण इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात दिव्यांगांना मिळणारे मानधन सर्वात कमी आहे. हे मानधन वेळेवर कधीच मिळत नाही. स्थानिक स्वराज्य संस्था दिव्यांगांसाठी तरतूद असलेला ५ टक्के निधी खर्च करीत नाहीत. अजूनही या विभागासाठी स्वतंत्र मंत्री नाही, सचिव नाही. जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र कार्यालय नाही, पदभरती नाही. इतर अनेक बाबींची पूर्तता झालेली नाही. दिव्यांगांच्या सर्वांगिण विकासासाठी मला आंदोलन करावे लागणार आहे. या पदावर राहून दिव्यांगासोबत बेईमानी कदापि शक्य नाही, म्हणून मी या पदाचा राजीनामा देत आहे, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >>>कारागृहात ई-मुलाखतीची सुविधा! कैद्याना कुटुंबाशी साधता येईल संवाद

२४ मे २०२३ रोजी बच्चू कडू यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या अध्यक्षपदी निवड करून त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला होता. पण, काही महिन्यांतच त्यांनी सरकारच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली होती. मी दिव्यांग अभियानाचा फक्त नावापुरता अध्यक्ष उरलो आहे, दिव्यांग मंत्रालयाचे काय निर्णय होतात ते सुद्धा मला कळवले जात नाही, अशी खंतही बच्चू कडू यांनी व्यक्त केली होती.

शासनाने शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी, मेंढपाळांच्या समस्यांवर तोडगा काढावा, या मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी येत्या ७ जानेवारीपासून अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर वाडा (निवासी) आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ते आता आगामी काळात सरकारच्या विरोधात भूमिका घेतील, हे स्पष्ट झाले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bachchu kadu resigns as president of divyang kalyan abhiyan amravati news mma 73 amy