अमरावती : निवडणुकीचा प्रचार संपण्याच्या बेतात असताना बडनेरा मतदारसंघातील युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रवी राणा यांच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी नवा डाव खेळला आहे. बच्चू कडू यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या बंडखोर उमेदवार प्रीती बंड यांना विनाअट पाठिंबा दिला आहे. प्रीती बंड यांच्या प्रचारार्थ त्यांनी रविवारी रात्री बडनेरा येथील आठवडी बाजार मैदानावर प्रचार सभा घेतली. या सभेत त्यांनी रवी राणांसह विविध राजकीय पक्षांवर त्यांच्या खास शैलीत टीका केली.
बच्चू कडू म्हणाले, बडनेरातील ही लढाई कुठल्याही पक्षाची नाही. स्वार्थासाठी राजकीय पक्ष जात-धर्माचा वापर करतात. या देशात डॉ. मनमोहन सिंह हे पंतप्रधान आणि डॉ. एपीजे अब्दूल कलाम हे राष्ट्रपती होते, तेव्हा हिंदू अडचणीत नव्हता. खरे तर ‘हिंदू खतरे मे है, मुसलमान खतरे मे है’, ही भाषा राजकारणी लोकांची आहे. पण, आत नेतेच ‘खतरे मे’ आले आहेत.
राणा दाम्पत्यावर टीका करताना बच्चू कडू म्हणाले, कुठलीही कामे घ्या, कंत्राटदार यांचेच आहेत. बडनेरात दलित आणि मुस्लीम समुदायातील लोकांना जवळ केले जात आहे. या ठिकाणी हिंदू शेरणी बेपत्ता आहे. यांचे राजकारण सोयीचे आहे. पण, लोकांना मूर्ख समजू नका. पैसे घेऊनही पराभव घडवल्याशिवाय राहणार नाहीत. रवी राणा हे अलीकडे संविधानाचा ‘उदो उदो’ करतात. लोकसभा निवडणुकीदरम्यान आम्ही आमच्या पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांच्यासाठी आरक्षित केलेले सायन्सकोर मैदान त्यांनी बळकावले, तेव्हा त्यांनीच कायदे पायदळी तुडवले होते. हे आम्हाला संविधान शिकवत आहेत.
प्रीती बंड यांना मशाल चिन्ह मिळाले नाही, हे बरे झाले. मशालीने ही आग पेटली नसती, असे सांगून बच्चू कडू म्हणाले, बडनेरा विधानसभा मतदारसंघात आम्हाला परिवर्तन घडताना दिसत आहे. असे असले तरी कोणीही गाफील राहू नये. आज प्रीती बंड यांच्या विजयासाठी घेतलेला ठाम निर्णय आपल्या नातेवाईकांनादेखील घरी जाऊन सांगा. आता दोन दिवस जागृत राहा. विरोधकांच्या कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. तिकडे तुषार भारतीय हे अपक्ष उमेदवार राणांना पाडण्यासाठी तयार आहेत. नवनीत राणा या स्वत:ला हिंदू शेरणी समजतात. पण, प्रीती बंड या शेतकरी, शेतमजुरांच्या वाघीण आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावे.