अमरावती : राज्यात शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतरही मंत्रीपद न मिळाल्याने अनेकवेळा जाहीरपणे नाराजी व्यक्त करणारे अचलपूरचे आमदार बच्चू कडू हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील होणार का, याची चर्चा सुरू झाली असून येत्या १८ जुलै रोजी दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीदरम्यान बच्चू कडू हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी बच्चू कडू यांना पत्र पाठवून एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे ही बैठक होणार आहे. बच्चू कडू हे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष असून राज्यात या पक्षाचे दोन आमदार आहेत. विविध राज्यांतील छोट्या पक्षांना एकत्र आणून एनडीए मजबूत करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाला मिळालेल्या निमंत्रणाकडे पाहिले जात आहे. यासंदर्भात बच्चू कडू यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
हेही वाचा >>>हवामान खात्याने दिला ‘या’ राज्यांना पुराचा इशारा
हेही वाचा >>>नागपूर: मंदिर वस्त्रसंहिता लागू करणे मंदिर व्यवस्थापनाला अडचणीचे, जाणून घ्या कारणे…
एनडीएच्या बैठकीसाठी आम्हाला भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडून निमंत्रण मिळाले आहे, पण अद्याप आमचा प्रहार जनशक्ती पक्ष एनडीए मध्ये सामील झालेला नाही, अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. बच्चू कडू हे नवी दिल्ली येथे होणाऱ्या बैठकीत महाराष्ट्रातील शेतकरी आणि दिव्यांगांच्या समस्या, अचलपूर येथील बंद पडलेल्या फिनले मिल विषयी तसेच इतर मुद्यांवर चर्चा करणार आहेत, असे त्यांनी सांगितले.बच्चू कडू यांना दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्षपद देण्यात आले असले, तरी त्यांचे समर्थक समाधानी नाहीत. काही दिवसांपुर्वी मंत्रीपदाचा दावा सोडण्याचा निर्णय बच्चू कडू यांनी घेतला होता, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विनंतीवरून कडू यांनी आपला निर्णय स्थगित केला होता.