अकोला जिल्ह्यातील रस्ते कामात कथित भ्रष्टाचार प्रकरणात पालकमंत्री म्हणून बच्चू कडू यांच्यावर वंचित आघाडीकडून करण्यात आलेल्या आरोपात तथ्य आढळून न आल्याने शहर कोतवाली पोलिसांनी चौकशीची फाईल बंद केली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळले असताना दुसरीकडे बच्चू कडू यांना ‘क्लीन चिट’ मिळाली.
जिल्हा नियोजन समितीच्या रस्ते कामात पालकमंत्री बच्चू कडूंनी १ कोटी ९५ लाखांचा निधीचा अपहार केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी केला होता. या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला गुन्हे दाखल न केल्याने वंचितने न्यायालयात धाव घेतली. प्रकाश आंबेडकरांनी ७ फेब्रुवारीला कारवाईच्या परवानगीच्या मागणीसाठी राज्यपालांची भेट घेतली होती. राज्यपालांच्या पत्रात यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे आदेश अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले. प्रथमश्रेणी न्यायालयाने कलम १५६ (३) नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश बजावले. शहर कोतवाली पोलीस ठाण्यात बच्चू कडूंवर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले. या प्रकरणात त्यांना सुरुवातीला तात्पुरता जामीन मिळाला. नंतर तो न्यायालयाने कायम केला. कथित भ्रष्टाचार प्रकरणात कुठलेही तथ्य आढळून आले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिसांनी फाईल बंद केली. राज्यात सरकार कोसळले असताना बच्चू कडू यांना मोठा दिलासा मिळाला आहे.