लोकसत्ता टीम

नागपूर : प्रहार संघटनेचे प्रमुख व अचलपूरचे विद्यमान आमदार बच्चू कडू यांचा महायुतीला पाठिंबा आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध आपला उमेदवार उभा केला होता. अलीकडेच त्यांच्या पक्षाचे मेळघाटचे आमदार हे शिवसेनेमध्ये (शिंदे) गेले. त्यामुळे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर नाराज आहे, आता तर भाजपने त्यांच्या विरोधात उमेदवार दिला आहे. कडू यांनी तिसरी आघाडी स्थापन करून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. भाजपने त्यांच्या विरोधात दिलेल्या उमेदवाराबद्दल कडू यांनी नागपूर येथे प्रतिक्रिया दिली.

बच्चू कडून मुंबईला जाण्यासाठी नागपूरला आले होते. त्यावेळी त्यांनी विमानतळावर वृत्तवाहिन्यांशी संवाद साधला. भजपने रविवारी त्यांच्या ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात अमरावती जिल्ह्यातील अचलपूर या बच्चू कडू यांच्या मतदारसंघातील उमेदवार प्रवीण तायड़े यांचा समावेश आहे. याबाबत कडू यांना विचारले असता ते म्हणाले, “ भाजपने त्यांच्या कार्यकर्त्याला बळीचा बकरा बनवले आहे. भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळावी म्हणून अनेक वर्ष ज्यांनी कठोर परिश्रम घेतले त्यांना उमेदवारी न देता पक्षाने नवख्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून काँग्रेसचा झेंडा फडकावण्याचा हा प्रयत्न आहे. दुसरीकडे राणा दाम्पत्य जिल्ह्यातून पक्ष संपुष्टात आणत आहे .”

आणखी वाचा-आचार्य उपेंद्र म्हणतात, ‘मधुमेह, गुडघादुखी मंत्र साधना, अंतर योगातून उपचार…’

ते पुढे म्हणाले “ तायडे नवीन कार्यकर्ते आहेत. त्यांना थेट विधानसभा निवडणुकीत उतरवण्यात आले आहे. ज्यांनी भाजपसाठी आयुष्य वेचले त्यांना भाजप निवडून आणू शकत नाही. केंद्र आणि राज्यात सत्ता असतानाही त्यांना पराभवाची भीती वाटत आहे. अचलपूरमध्ये भाजपकडे अनेक ज्येष्ठ नेते आहेत. पण त्यांना उमेदवारी न देता एका नवख्या कार्यकर्त्याला भाजपने उमेदवारी देऊन काय साध्य केले हे कळायला मार्ग नाही, एकीकडे काँग्रेस मुक्त भाजपचा नारा द्यायचा आणि दुसरीकडे अचलपूर काँग्रेस युक्त करायचे,असे कडू म्हणाले.

आणखी वाचा-वंचितच्या गोंधळानंतर योगेंद्र यादव म्हणाले “हा तर बाबासाहेबांच्या संविधानावर हल्ला”

दरम्यान पहिल्याच यादीत कडू यांच्या विरोधात उमेदवार देऊन भाजपने कडू यांना स्पष्ट संकेत दिले आहे. कडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक मानले जातात. त्यांचा मतदारसंघ महायुतीत भाजपसाठी सुटला असला तरी शिंदे तेथे प्रचारासाठी येऊ शकतात. शिंदे यांनी शिवसेना फोडली व आमदारांना गुवाहटी येथे नेले त्यावेळी कडू शिंदेसोबत होते. या मुद्यावरून त्यांचे राजकीय विरोधक रवी राणा यांनी कडू यांच्यावर जहरी टीकाही केली होती. त्यामुळेच कडू यांनी राणांच्या विरोधात मोहीम उघडली होती.