अमरावती : पश्चिम विदर्भात वर्षभरात १ हजार १५१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या असताना या प्रश्नावर सरकारची संवेदनशीलता दिसत नाही. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये हिंदू शेतकऱ्यांची संख्याच जास्त आहे. राज्यात आणि केंद्रात हिंदुत्ववादी सरकार आहे. मग तरीही हिंदू शेतकऱ्यांवर स्वत:ला संपवण्याची वेळ का येते? असा संतप्त सवाल बच्चू कडूंनी सरकारला विचारला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या नेतृत्वात येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शेतकरी आणि मेंढपाळांच्या विविध मागण्यांसाठी ‘वाडा आंदोलन’ सुरू करण्यात आले आहे. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी सरकारवर टीका केली.

हेही वाचा…नागपूर : लग्नाच्या वाढदिवशीच दाम्पत्याची आत्महत्या, अपत्य होत नसल्यामुळे…

बच्चू कडू म्हणाले, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागत आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये हिंदूंचीच संख्या जास्त आहे. तरीही केंद्रातील आणि राज्यातील हिंदूत्ववादी सरकारला शेतकऱ्यांचा कळवळा का नाही, हा प्रश्न आहे. आम्ही शेतकरी, शेतमजूर, मेंढपाळांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलो आहोत. आंदोलनाची ही आमची पहिलीच वेळ नाही. आमचा जन्मच आंदोलनासाठी झाला आहे. पदावर असो किंवा नसो, आम्ही आमची सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्षाची भूमिका सोडणार नाही. सरकारने आमच्या मागण्यांची दखल घ्यावी, पोलिसांनी आंदोलकांची अडवणूक करू नये, अशी आमची अपेक्षा असल्याचे बच्चू कडू म्हणाले.

राज्यातील मेंढपाळ आपल्या न्याय मागणीकरिता सरकारचे उंबरठे झिजवित असताना त्यांच्या मागण्यांच्या संबधात मुख्यमंत्री कुठलेही ठोस पाऊल उचलत नाहीत. शेतकरी व मेंढपाळांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. सोयाबीन, तूर, कापसाचे भाव कोसळले आहेत. दुसरीकडे बियाणे, रासायनिक खते, शेणखताचे भाव वाढत जात आहे. अशी परिस्थिती असताना शेतकऱ्यांनी आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा? असा सवालही कडू यांनी यावेळी सरकारला विचारला आहे.

हेही वाचा…मंत्रीच म्हणतात “वाळू धोरणात सुधारणा केल्या तरी माफिया नियम मोडतातच”

येथील संत गाडगेबाबा मैदानावरून मोर्चाला सुरूवात झाली. मेंढपाळाच्या वेशात घोड्यांवर स्वार होऊन बच्चू कडू आणि महादेव जानकर हे विभागीय आयुक्त कार्यालयावर पोहचले. मोर्चादरम्यान कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चात शेळ्या, मेंढ्या आणि घोड्यांसह शेकडो आंदोलक सहभागी झाले होते.राज्य सरकारने विधानसभा निवडणूकीच्या काळात घोषीत केलेली सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना तातडीने मिळावी, चराईकरिता परराज्यातून येणाऱ्या मेंढपाळांवर बंदी घालण्यात यावी अश्या अनेक मागण्या यावेळी ‘वाडा आंदोलना’तून करण्यात आल्या आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bachu kadu criticized government over farmers suicide during wada protest mma 73 sud 02