गडचिरोली : दिव्यांगांकडे मताच्या दृष्टीने नव्हे तर सेवा आणि कर्तव्य म्हणून बघितल्या जावे. संख्या कमी आहे म्हणून त्यांच्याकडे लक्ष देण्यास राजकारणी आजपर्यंत दुर्लक्ष करीत आले आहे. राज्यभरात सुरू असलेल्या ‘दिव्यांगाच्या दारी’ उपक्रमात सहभागी होण्यास नेते अनुत्सुक आहेत. किमान गडचिरोलीत तरी दोन आमदार उपस्थित आहेत, अशी खंत दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी गडचिरोली येथे व्यक्त केली. ते शहरातील संस्कृती सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
गडचिरोली येथे आयोजित ‘दिव्यांगांच्या दारी’ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू आले होते. यावेळी ते म्हणाले की, मागील दोन दशकांपासून मी दिव्यांगांसाठी लढतो आहे. यादरम्यान केलेल्या टोकाच्या आंदोलनामुळे माझ्यावर साडेतीनशे खटले दाखल आहेत. तरीपण आम्ही प्रयत्न सोडले नाहीत. त्यामुळे आज महाराष्ट्रात दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात आला. प्रत्येक विभागात त्यांच्यासाठी ५ टक्के निधीची तरतूद करण्यात येत आहे. यातून दिव्यांग कल्याणासाठी विविध उपक्रम राबविणे शक्य होत आहे. परंतु त्यांची संख्या कमी असल्याने राजकीय नेते यासाठी अनुत्सुक असल्याचे दिसून येत आहे. मी जवळपास वीस जिल्ह्यांमध्ये या उपक्रमात सहभागी झालो मात्र, तेथील नेते, आमदार उपस्थित नव्हते. गडचिरोली येथे तरी किमान दोन आमदार उपस्थित आहे, अशी खंत व्यक्त करून कडू यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना टोला लगावला.
हेही वाचा – काय सांगता? चक्क वाघ आणि कासवात रंगलीय स्पर्धा! नेमका काय आहे प्रकार? जाणून घ्या…
सोबतच दिव्यांग कल्याण विभागासाठी तत्परतेने निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभारदेखील व्यक्त केले. गडचिरोली येथील कार्यक्रमात पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते यांच्यासह विधानपरिषद सदस्य अनुपस्थित होते. यावेळी आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते जवळपास पाचशेहून अधिक दिव्यांगांना साहित्य तसेच विविध लाभ देण्यात आला. कार्यक्रमाला आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी संजय मीणा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी व दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा – गोंदिया : नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान विकासापासून वंचित; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
गडचिरोली जिल्हा आदर्श ठरावा
राज्यात गडचिरोली जिल्हा म्हटले की अधिकारी येण्यास तयार नसतात. दुर्गम आणि मागास म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे. परंतु, दिव्यांगाच्या दारी हा उपक्रम अतिशय उत्तम पद्धतीने राबवून गडचिरोली जिल्हा इतर जिल्ह्यांसाठी आदर्श ठरावा, अशा सूचना आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.