नागपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा पहिलाच नागपूर दौरा असल्यामुळे पोलीस आयुक्तांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. मात्र, राष्ट्रपती बंदोबस्तासाठी पहाटे साडेपाच वाजतापासून तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना निकृष्ट नाष्टा देण्यात आला. त्यामुळे अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी नाष्टा नाकारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राष्ट्रपती मुर्मू यांच्या नागपूर दौऱ्यानिमित्त पोलीस आयुक्तांनी गेल्या तीन दिवसांपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात केला. बंदोबस्ताचे ठिकाण सोडण्यास पोलीस कर्मचाऱ्यांना परवानगी नाही. त्यामुळे पोलीस कर्मचारी बंदोबस्ताच्या ठिकाणी १२-१२ तास तैनात असतात. बुधवारी पहाटे साडेपाच वाजतापासून राजभवन आणि अन्य परिसरात पोलीस कर्मचाऱ्यांना हजर राहण्याचे आयुक्तांचे आदेश होते. पोलीस कर्मचारी पहाटेपासून ते सकाळी ११ वाजेपर्यंत एकाच ठिकाणी तैनात होते. पोलीस आयुक्तालयाच्या वतीने कर्मचाऱ्यांना नागपुरातील एका नामांकित कंपनीचा नाष्टा पाठवण्यात आला. मात्र, नाष्ट्याच्या डब्यात आंबट वास असलेला समोसा, जळलेला उपमा आणि दुर्गंध येत असलेली खोबऱ्याची चटणी देण्यात आली होती. निकृष्ट नाष्टा असल्यामुळे अनेकांनी फेकून दिला तर काहींनी परत केला.
काही महिला कर्मचाऱ्यांनी मळमळ व ओकारी झाल्याची तक्रार केली आहे. निकृष्ट नाष्ट्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. या प्रकरणात मुख्यालयाच्या पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील आणि विशेष शाखेच्या उपायुक्त श्वेता खेडकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.