नागपूर : माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते अनिल देशमुख यांनी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर भाजपच्या सांगण्यावरून करण्यात आला, असा गंभीर आरोप माध्यमांशी बोलताना नागपूर येथे केला. महानगरदंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालात अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला पोलीस कर्मचारी जबाबदार आहे असे नमुद केले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना अनिल देशमुख यांनी वरील आरोप केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरोपी शिंदेनी स्वत:वर गोळा झाडल्या नाही तर पोलिसांनी त्याला ठार मारले हे आपण आधीच सांगितले होते. ज्या शाळेत लैंगिक अत्याचार झाला. ती शाळा भाजपशी संबंधित मंडळीची होती. त्यांना वाचवण्यासाठी शिंदेचा एन्काऊंटर करायला लावले काय, असा सवालही देशमुख यांनी केला.

हेही वाचा – कठोर पोलीसही हळहळले…‘लुसी’ला अखेरची सलामी देताना…

अक्षय शिंदेच्या अटकेनंतर पोलीस त्याला वाहनातून घेऊन जातात त्याने पोलिसांची बंदूक हिसकावली आणि स्वत: गोळी झाडली. त्यात त्याचा मृत्यू झाला, असे सांगण्यात आले. त्याचवे‌ळी आपण संशय व्यक्त केला होता. पोलिसांजवळील रिवॉल्व्हर कोणी काढून घेऊन गोळ्या झाडू शकत नाही. कारण, बंदूक लॉक असते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशीची मागणी केली होती. आपण व्यक्त केलेली शंका खरी ठरल्याचे न्यायदंडाधिकाऱ्यांच्या निष्कर्षांवरून दिसून येते, असे देशमुख म्हणाले.

अक्षय शिंदेनी ज्या बंदूकीने गोळ्या झाडल्या, त्यावर त्याच्या बोटांचे ठसे नव्हते. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ही बनावट चकमक कोणी केली. कोणाच्या सांगण्यावरून घडवून आणली आणि कोणाला वाचवण्यासाठी केली, असा सवालही देशमुख यांनी केला.

हेही वाचा – संघविरोधी आंदोलन भाग न घेतल्याने वडेड्डीवार, ठाकरे, धवड युवक काँग्रेसमधूम पदमुक्त,संघटनेच्या कामात कसूर केल्याचा ठपका

बदलापूर येथील एका खासगी शाळेत गेल्या ऑगस्ट महिन्यात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता. त्या प्रकरणातील अक्षय शिंदेचा पोलिसांसोबतच्या चकमकीत मृत्यू झाला होता. अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाल्यानंतर विरोधी पक्षांनी सरकारवर तीव्र टीका केली होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badlapur sexual assault case accused akshay shinde encounter case former home minister anil deshmukh allegation rbt 74 ssb