अमरावती : बडनेरा मतदारसंघातील वातावरण सुरूवातीपासूनच तापलेले. युवा स्‍वाभिमान पक्षाचे रवी राणा हे भाजप समर्थक आमदार. त्‍यामुळे येथे महायुतीला कुणाला पाठिंबा देणार, याची प्रतीक्षा होती. अपेक्षेप्रमाणे भाजपने रवी राणांना समर्थन जाहीर केले. दुसरीकडे, भाजपचे इच्‍छुक उमेदवार तुषार भारतीय हे पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरलेले. यावेळी माघार अशक्‍यच असा नारा त्‍यांनी दिलेला. राणांना महायुतीने पाठिंबा दिल्‍यास बंडखोरी अटळ मानली गेली. तुषार भारतीय यांनी अपक्ष उमेदवार म्‍हणून अर्ज भरला. त्‍यावेळी भाजपच्‍या एका गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने हजर होते.

तुषार भारतीय यांनी गेल्‍या दोन ते अडीच वर्षांपासून बडनेरा मतदारसंघात प्रचार सुरू केला आहे. त्‍यांची मनधरणी करण्‍याचे प्रयत्‍न भाजपच्‍या नेत्‍यांनी केले, पण ते अडून बसले. भाजपची उमेदवारी न मिळाल्‍याने त्‍यांनी बंडखोरी करण्‍याचा निर्णय घेतला. आता त्‍यांची प्रचाराची पद्धत चर्चेत आली आहे.

तुषार भारतीय यांनी प्रचार पत्रकावर ‘निष्‍ठावंत भारतीय जनता पार्टी’, असा केलेला उल्‍लेख लक्षवेधी ठरला आहे. हीच ती वेळ संघटन मजबूत करण्‍याची. आपला माणूस निवडून आणण्‍याची, असा नारा या पत्रकावर आहे. हे पत्रक सर्वत्र झळकले आहे.

हेही वाचा >>> चार मतदारसंघांमध्ये उमेदवारांची पायाला भिंगरी…..चार चार तालुके, डोंगर दऱ्या आणि…..

विशेष म्‍हणजे या पत्रकावर अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्‍ण अडवाणी, बाळासाहेब ठाकरे, पंडित दीनदयाल उपाध्‍याय, डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी, मुरली मनोहर जोशी, सुषमा स्‍वराज, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, पांडुरंग फुंडकर यांची छायाचित्रे आहेत. 

बडनेरा मतदारसंघातून गेल्‍या निवडणुकीत रवी राणा हे काँग्रेस, राष्‍ट्रवादीच्‍या पाठिंब्‍यावर उभे होते. पण, निवडून आल्‍यानंतर त्‍यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. गेल्‍या चार दशकांपासून पक्षाचे कामे करणाऱ्या कार्यकर्त्‍यांना उमेदवारी मिळत नाही आणि उपऱ्यांना सन्‍मानाचे स्‍थान मिळते, अशी खंत तुषार भारतीय यांनी व्‍यक्‍त करीत बंडाचा झेंडा उंचावला आहे.

हेही वाचा >>> मेळघाटात भाजपमध्‍ये बंडखोरी…. माजी आमदाराची रिंगणात उडी….

रवी राणा हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटचे मानले जातात. भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रवी राणा हे भाजपमध्‍ये येतील, असे वक्‍तव्‍य केले होते, पण राणांनी लगेच त्‍याला नकार देत आपण युवा स्‍वाभिमान पक्षातच राहू, असे जाहीर केले होते. बडनेरामधून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे सुनील खराटे यांच्‍या विरोधात प्रीती बंड यांनी केलेली बंडखोरी देखील गाजत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीला या ठिकाणी बंडखोरीचा सामना करावा लागत आहे.