लोकसत्‍ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमरावती : नु‍कत्‍याच झालेल्‍या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव झाला. आता रवी राणांना देखील पराभूत करू, अशा वल्‍गना विरोधक करीत आहेत. नवनीत राणांचा नंबर लागला, पण आता माझा नंबर तुम्‍ही लावू नका. ज्‍या दिवशी मी पराभूत होईल, त्‍यानंतर कधीही निवडणूक लढणार नाही, असे मी ठरविलेले आहे, अशा शब्‍दात बडनेराचे आमदार रवी राणा यांनी सोमवारी मतदारांना साद घातली.

मुख्‍यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मंजूर झालेल्‍या लाभार्थी प्रमाणपत्राचे वाटप येथील संत ज्ञानेश्‍वर सभागृहात करण्‍यात आले, त्‍यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा प्रामुख्‍याने उपस्थित होत्‍या.

आणखी वाचा-Ravi Rana : “या निवडणुकीत आशीर्वाद द्या, अन्यथा लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये खात्यातून काढून घेईन”, आमदार रवी राणांचे विधान चर्चेत!

रवी राणा म्‍हणाले, राजकारण माझा धंदा नाही, मी रक्‍ताचे पाणी करून लोकांना मदत करतो, व्‍यवसाय करण्‍यासाठी मी राजकारणात आलेलो नाही. नवनीत राणा यांना पराभूत केले, आता रवी राणांना हरवू, असे स्‍वप्‍न विरोधक पाहत आहेत, पण जोपर्यंत महिलांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, तोपर्यंत कुणी माझ्या केसालाही धक्‍का लावू शकणार नाही. ही ताकद मला माहीत आहे.

विरोधकांना प्रत्‍युत्‍तर देताना रवी राणा म्‍हणाले, पावसाळ्यातील बेडकांप्रमाणे काही लोक आता मते मागण्‍यासाठी पुढे येतील. माझ्यावर टीका करतील, नवनीत राणा यांच्‍यावर आरोप करतील. पण, मी विचलीत होणार नाही. या बेडकांपासून मात्र जनतेने सावध झाले पाहिजे. संविधान धोक्‍यात असल्‍याची आरोळी ठोकून विरोधकांनी नवनीत राणा यांना पराभूत केले, पण एक सक्षम असा लोकप्रतिनिधी आम्‍ही गमावला आहे. मी किराणा वाटप करतो, म्‍हणून विरोधक माझ्यावर टीका करतात. पण, मी त्‍यांची पर्वा करीत नाही. येत्‍या काळात १ लाख कुटुंबांना किराणा घरपोच पोहचून दिला जाणार आहे, सोबतच दिवाळी सणासाठी एक साडी देखील भेट दिली जाणार आहे. विरोधकांनी मूठभर साखर वाटप करून दाखवावे, असे आपले त्‍यांना आव्‍हान आहे. विरोधकांकडे केवळ पैशांची आवक आहे, जावक काहीच नाही, मालमत्‍ता गोळा करण्‍यासाठीच ते राजकारण करतात, अशी टीका रवी राणा यांनी केली.

आणखी वाचा-गोंदिया: अवैध फलकामुळे अपघात, शिक्षिकेचा जागीच मृत्यू

रवी राणा म्‍हणाले, लोकांच्‍या मदतीसाठी आपण धावून जातो. किराणा वाटप हे त्‍याच भावनेतून केले जाते. विरोधकांनी मात्र आपल्‍यावर सातत्‍याने टीका केली आहे. लोकच त्‍यावर उत्‍तर देणार आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badnera mla ravi rana appealed to the voters on monday mma 73 mrj