Ravi Rana in Badnera Vidhan Sabha Constituency : बडनेरा हे अमरावती जिल्ह्यातील एक शहर आहे. रवी राणा हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. राणा तिसऱ्यांदा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. राणा यांनी अमरावती महाविद्यालयातून बी.कॉम पदवीचे शिक्षण घेतले आहे. अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा या त्यांच्या पत्नी आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत बडनेरा मतदारसंघातून रवी राणा युवा स्वाभिमान पक्षाकडून उभे आहेत. भाजपने बडनेरा मतदारसंघात त्यांना समर्थन जाहीर केले आहे.
फडणवीस यांचे खंदे समर्थक
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रवी राणा हे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या समर्थनाच्या बळावर उभे राहिले होते. त्यांनी शिवसेनेच्या प्रिती बंड यांचा १५ हजार ५४१ मतांनी पराभव केला होता. मात्र निवडणुकीनंतर रवी राणा यांनी भाजपला पाठींबा दिला होता. रवी राणा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक मानले जातात. मात्र स्थानिक पातळीवर भाजपा नेत्यांशी त्यांचे सख्य नाही. मतदारसंघातील भाजपचे नेते त्यांना विरोध करतात. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली होती त्यास स्थानिक नेत्यांनी विरोध केला होता.
हेही वाचा – History of exit polls: भारतातील मतदानोत्तर चाचण्यांची (एग्झिट पोल) सुरुवात कधी झाली?
महायुतीतूनच मोठे आव्हान
रवी राणा यांना बडनेरा मतदारसंघात भाजपने समर्थन जाहीर केले आहे. या मतदारसंघात भाजपच्या स्थानिक नेत्यांचा रवी राणांना विरोध आहे. भाजपचे तुषार भारतीय रवी राणा यांच्याविरोधात मैदानात उतरले आहेत. भाजपशी बंडखोरी करत तुषार भारतीय यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सुनील खराटे यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. मात्र खराटे यांच्या विरोधात प्रीती बंड यांनीही बंडखोरी केली आहे. या मतदारसंघात महायुती आणि महाविकासआघाडी दोघांना बंडाचा सामना करावा लागत असून रवी राणा या सर्व अव्हानांना पार करत पुन्हा निवडून येतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
नेहमी चर्चेत
२०२२ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार असताना रवी राणा आणि नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यासमोर हनुमान चालीसा पठनाची घोषणा केली होती. त्यानंतर या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेत महिलांना १५०० रुपये महिना लाभ मिळणार आहे. या योजनेबाबत रवी राणा यांनी केलेल्या विधानाने महाविकास आघाडीसह महायुतीतील नेत्यांनीही आक्षेप घेतला.