बुलढाणा: एप्रिल महिन्यात खामगाव-शेगाव मार्ग चांगलाच चर्चेत आहे. या मार्गावर २ एप्रिलला झालेल्या भीषण अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला होता. राज्य परिवहन महामंडळाची बस, खाजगी बस आणि बोलेरो वाहन एकमेकांवर आदळल्याने ही दुर्घटना घडली होती. घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच या मार्गावर झालेल्या अपघातात एक इसम गंभीर जखमी झाला.
खामगाव-शेगाव मार्गावरील वरील सिद्धिविनायक अभियांत्रिकी महाविद्यालया कॉलेजसमोर ५ एप्रिल रोजी संध्याकाळी कार आणि दुचाकीचा अपघात झाला. त्यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. संध्याकाळी घटना स्थळ पंचनामा, वाहतूक सुरळीत करणे, रुग्णाला अगोदर खामगाव येथील उप जिल्हा रुग्णालयात व नंतर अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करणे आदी आवश्यक सोपस्कार पार पडले. नंतर अपघातग्रस्त चारचाकी आणि दुचाकी वाहन शेगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
शेगाव तालुक्यातील लासुरा येथील सूरज साहेबराव बोदडे (२५) हे दुचाकी क्रमांक एमएच-३४, एपी-४५११ ने खामगावकडे जात होते. सिद्धिविनायक टेक्निकल कॉलेजच्या जवळ समोरून येणाऱ्या कार क्रमांक एमएच-२१, डीएफ-३४४४ ने त्यांना धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ खामगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना अकोला येथील रुग्णालयात पाठविले.
पोत्यात नोटा!
दरम्यान अपघातग्रस्त चारचाकी वाहनाची तपासणी केल्यावर शेगाव ग्रामीण ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी देखील चक्रावून गेले, कारण कारमध्ये तब्बल ७० लाख ४ हजार ५०० रुपये रोख असलेले दोन पोते आढळले. नोटा मोजण्यासाठी स्टेट बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांना देण्यात आली.
ही सुमारे पाऊण कोटींची रक्कम शेगाव ग्रामीण पोलिसांनी जप्त केली आहे. याबाबतची माहिती नागपूर येथील आयकर विभागाच्या कार्यालयाला दिल्याचे अपर पोलिस अधीक्षक श्रेणीककुमार लोढा यांनी प्रसिद्धी सांगितले. या रोकड मध्ये १००, २०० व ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल आहेत. त्याची पोलिसांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या मोजणीचे व्हिडिओ चित्रणही केल्याचे अपर अधीक्षक लोढा यांनी सांगितले.
याप्रकरणी कारचालक भागवत ज्ञानदेव आडेकर, नरेश खंडेराव गाडे, दोघेही (राहणार जालना) यांना पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम कशासाठी व कुठून नेली जात होती, याविषयी तपास करण्यात येत आहे. दुसरीकडे अपघातग्रस्त कारमालकाचे ‘ऑनलाईन रेकॉर्ड’ पाहिले असता, मालक म्हणून शरद बागोरिया, जालना असे नाव दाखवले जात आहे. त्या वाहनावर अतिवेगाने वाहन चालवल्याचे दोन दंडही प्रलंबित आहेत