बुलढाणा : शिर्डीच्या साईबाबांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे बागेश्वर धाम पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री आज रविवारी विदर्भ पंढरी शेगाव नगरीत दाखल झाले. संत नगरी शेगाव येथील गजानन महाराज संस्थानला भेट देऊन ते गजानन महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक झाले.आपल्या प्रवचन, समस्या पूर्ती कार्यक्रम, यामुळे देशभरात प्रसिद्ध आणि अधूनमधून वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उत्तर महाराष्ट्रातील जळगाव खान्देश येथे आयोजित धार्मिक कार्यक्रमासाठी दौऱ्यावर आले होते. आज रविवारी ते अल्पकालीन दौऱ्यावर शेगावात पोहोचले होते.
मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गडा गावात असलेले ‘बागेश्वर धाम’ हे स्वयंभू हनुमानजींसाठी देश-विदेशात प्रसिद्ध आहे. बागेश्वर धाम ही अनेक तपस्वींची दैवी भूमी आहे, जिथे नुसते दर्शन घेऊन लोकांना बालाजी महाराजांचे आशीर्वाद मिळतात. येथे बालाजी महाराज एका अर्जाद्वारे तुमची समस्या ऐकतात आणि धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री, ज्यांना जग बागेश्वर धाम सरकार या नावाने संबोधते, त्यांच्यामार्फत ते समस्यांचे समाधान मिळवतात.
हेही वाचा…अकोल्यात गॅस टँकर उलटला; सुदैवाने जयपूर अपघाताची पुनरावृत्ती टळली
हेच धीरेंद्र कृष्ण शास्त्री आज संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या चरणी लिन होण्यासाठी संत नगरीत दाखल झाले होते. शेगाव येथे संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले. केवळ एका तासापुरता त्यांचा हा दर्शन दौरा होता. यावेळी त्यांनी श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन संस्थानच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत गजानन महाराज संस्थानतर्फे शेगाव आणि अन्य शाखांतर्फे वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. शेगाव भेटीमागे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा हाच उद्देश होता, असे यावेळी सांगण्यात आले. मात्र या भेटीचा फारसा गाजावाजा करण्याचे आणि प्रसिद्धी करण्याचे टाळण्यात आले. पूर्व नियोजित वेळेपेक्षा उशिराने त्यांचे हेलिकॉप्टरने शेगाव परिसरात आगमन झाले.
जळगाव खांदेशच्या विमानतळावरून ते हेलिकॉप्टरने शेगावमध्ये पोहचले. माऊली अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरामध्ये हेलीपॅड तयार करण्यात आले होते. खराब हवामानामुळे त्यांना शेगावात दाखल होण्यास विलंब लागला. यावेळी संत गजानन महाराज संस्थानकडून त्यांचे स्वागत सत्कार करण्यात आले. गर्दी लक्षात घेता जिल्हा पोलीस प्रशासनाने दौरा स्थळ मार्गावर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. दर्शनानंतर त्यांनी पुन्हा हेलिकॉप्टरने जळगावकडे प्रयाण केले.
हेही वाचा…नागपूर : पाच दिवसांपासून दररोज एक हत्याकांड! उपराधानीत कायदा व सुव्यवस्था…
साईबाबांबाबत वादग्रस्त वक्तव्य
धीरेंद्र शास्त्री यांनी जबलपूरमध्ये श्री साईबाबा यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. आपल्या धर्माच्या शंकराचार्य यांनी साईबाबांना देवाचे स्थान दिलेले नाही आणि शंकराचार्य यांचे म्हणणे समजून घेणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. साईबाबा संत असू शकतात, फकीर असू शकतात, पण देव असू शकत नाहीत. कोल्ह्याची कातडी पांघरून कोणी सिंह होऊ शकत नाही, देव देव आहेत, संत संत आहेत. त्यामुळे साई हे देव नाहीत, हे शंकराचार्य यांचे विधान प्रमाण असल्याचे धीरेंद्र शास्त्री म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे साई भक्तांनी संताप व्यक्त केला होता. साईबाबा आमचे दैवत आहे, अशी प्रतिक्रिया साई भक्तांनी दिली होती.