नागपूर : मानवधर्माची शिकवण देणाऱ्या बाबा जुमदेव महाराज आणि त्यांच्या परमात्मा एक सेवकांबद्दल वादग्रस्त आणि आक्षेपार्ह विधान बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज उर्फ बागेश्वर बाबा यांनी भंडाऱ्याच्या मोहाडीतही काल सायंकाळी झालेल्या भागवत सप्ताहात केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बागेश्वर बाबांच्या या वक्तव्यामुळे बाबा जुमदेव महाराज यांना मानणाऱ्या हजारो सेवकांच्या भावना दुखावल्या आहेत. या बागेश्वर बाबांविरुद्ध गुन्हे दाखल करून दुपारी ४ वाजेपर्यंत अटक करावी, अशी मागणी केली जात आहे. नागपूरमध्येही धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधातही याआधीही तक्रार करण्यात आली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही त्यांच्याविरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा हा विषय तापला आहे. नेहमी वादग्रस्त विधान करून प्रसिद्धी झोतात राहणारे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज उर्फ बागेश्वर महाराज यांच्या भागवत कथा सप्ताहाचे आयोजन भंडाऱ्याच्या मोहाडीत करण्यात आले आहे.

हेही वाचा…बुलढाणा : सावधान! अवैध बायो डिझेलची सर्रास विक्री; ३१ हजार लिटर साठा जप्त

शनिवारी सायंकाळी झालेल्या भागवत सप्ताहात महानत्यागी बाबा जुमदेवजी (महानत्यागी बाबा जुमदेव यांना मानणारा एक मोठा समुदाय पूर्व विदर्भात आहे) यांच्या आणि त्यांच्या सेवकांच्या विरोधात हनुमानजींच्या पुजेवरून भावना दुखावणारे वादग्रस्त विधान केले. यामुळे भावना दुखावलेल्या परमात्मा एक सेवकांनी आणि बाबा जुमदेव महाराज यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी बागेश्वर बाबांच्या विरोधात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात काल रात्री तक्रार दाखल केल्या. यात आता राजकीय पक्षांच्या नेत्यांनी उडी घेतली असून शिवसेना समर्थित अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे.

बागेश्वर बाबा नेमके काय बोलले?

नागपूर आणि भंडारा या क्षेत्रामध्ये एका विशेष संप्रदायाला मानणारा वर्ग आहे. ते हनुमानजींना तर मानतात. मात्र, हनुमानजींची पूजा करणे मानत नाही. श्राद्ध करायचे नाही, माता पित्यांचे फोटो ठेवायचे नाहीत, राम राम बोलायचे नाही, जय गुरुदेव बोला….जो हनुमान संपूर्ण जीवनभर राम राम बोलला, त्यांचे उपासक राम राम नाही बोलणार. हद्द झाली यार….रसगुल्ला खात आहेत…मात्र शुगर असल्याचे सांगत आहेत. असे करणाऱ्या लोकांनी कान उघडून ऐकावे की, तुमचे पूर्वज नरकात गेले आहे, तुमची येणारी पिढी पण नरकात जाईल. अशी भक्ती हनुमानजींना कधीच प्रिय नाही, असे वक्तव्य बागेश्वर बाबांनी भागवत सप्ताहात केले.

हेही वाचा.नवनीत राणांच्‍या पत्रकांवर छायाचित्र नको, संजय खोडकेंचा विरोध; महायुतीत कुरबुरी

वादग्रस्त विधानानंतर तणाव

बागेश्वर बाबांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल भंडारा, नागपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भात लाखोंच्या संख्येत असलेल्या बाबा जुमदेवजी यांना मानणाऱ्या परमात्मा एक सेवकांमधुन रोष व्यक्त केला जातोय. सोबतच बाबा बागेश्वरांना अटक करा, या मागणी करिता मोहाडी पोलीस स्टेशन येथे परमात्मा एक सेवकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून बाबा बागेश्वरांना तात्काळ अटक करा, अशी मागणी या समुदायामार्फत केली जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bageshwar dham s dhirendra shastri did controversial statement on jumdev maharaj and his followers sparks outrage in nagpur and bhandara dag 87 psg