नागपूर : वाघांच्या अधिवासात होणाऱ्या पर्यटनदरम्यान पर्यटक वाहनांकडून होणाऱ्या वाहनाच्या गतीचे उल्लंघन, एकापेक्षा अधिक वाहनांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी, ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ थांबणारी वाहने आदींवर आता ‘बघिरा अ‍ॅप’ची नजर असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने व्याघ्रप्रकल्प, अभयारण्यातील पर्यटनाकरिता नियम ठरवून देण्यात आले आहे. मात्र, अनेकदा व्याघ्रदर्शनासाठी, छायाचित्रणासाठी पर्यटकांकडून होणाऱ्या आग्रहामुळे वाहनचालक, पर्यटक मार्गदर्शक यांच्याकडून या नियमांचे उल्लंघन होते. त्यावर आता ‘बघिरा अ‍ॅप’च्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. महाराष्ट्रातील पेंच व्याघ्रप्रकल्पात लवकरच त्याचा वापर सुरू होत आहे. मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्रप्रकल्प, कान्हा व्याघ्रप्रकल्प तसेच बांधवगड व्याघ्रप्रकल्पात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या निर्देशानंतर या ‘अ‍ॅप’चा वापर सुरू करण्यात आला. गाभा आणि बफर क्षेत्रातील पर्यटक वाहनांच्या स्थितीवर या माध्यमातून व्याघ्रप्रकल्प व्यवस्थापन नजर ठेवू शकते. महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातही ते वापरले जात आहे. वाघांचे छायाचित्र काढण्यासाठी पर्यटकांच्या आग्रहावरून वाहने वाघांच्या खूप जवळ गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे व्याघ्रप्रकल्पाच्या आत एकाच ठिकाणी गर्दी करणाऱ्या सफारी वाहनांविरुद्ध कारवाई करता येईल.

हेही वाचा >>>ठरलं! विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा ‘या’ तारखेपासून…

वाहनांचा वेग आणि गर्दीचा मागोवा घेण्यास हे ‘अ‍ॅप’ अतिशय उपयुक्त आहे.

वाहनचालक, पर्यटक मार्गदशक यामुळे प्राधिकरणाच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन करू शकणार नाही. कारण या ‘अ‍ॅप’च्या माध्यमातून व्यवस्थापनाची नजर त्यांच्यावर असणार आहे, असे पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक डॉ. प्रभूनाथ शुक्ल यांनी सांगितले.

सीमा नसलेला भ्रमणध्वनी पर्यटक मार्गदर्शकाकडे दिला जातो. त्यात हे ‘बघिरा अ‍ॅप’ अंतर्भूत असते. या अ‍ॅपमध्ये वाहनांची गती, ते वाहन कुठून जात आहे, किती वेळ थांबले आहे, या सर्वाची नोंद होते.

विशेष म्हणजे पर्यटक मार्गदर्शक आणि वाहनचालक आता पर्यटकांना सांगू शकतात की, वाघांच्या जवळ वाहन नेता येणार नाही, अधिक वेळ थांबता येणार नाही. त्यामुळे पर्यटकदेखील त्यांना आग्रह करू शकणार नाही.

ताडोबा व्याघ्रप्रकल्पात या ‘अ‍ॅप’चा बराच फायदा झाला आहे, असे ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे उपसंचालक नंदकिशोर काळे यांनी सांगितले.

निर्देश काय?

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने राज्यातील सर्व व्याघ्रप्रकल्पांमध्ये कार्यरत वाहनांमध्ये जीपीएस यंत्रणा बसवण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली होती. गाभा आणि बफर क्षेत्रातील वाहनांच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी, दोन वाहनांमधील अंतर तपासण्यासाठी, पर्यटन नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी ही मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baghira app to monitor violation of tourism rules in pench tiger project amy