नागपूर : बहेलिया टोळीने दीड ते दोन वर्षांत राज्यात २५ हून अधिक वाघांची शिकार केली. यातून सुमारे सात कोटी रुपयांचा व्यवहार केला, अशी माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे, गेल्या चार महिन्यांपासून बहेलिया टोळीतील शिकारी राज्यात आहेत. परंतु, वन खात्याला त्याचा सुगावादेखील लागलेला नाही.

मेळघाट वन्यजीव गुन्हे शाखेमुळे राजुरा वन खात्याला बहेलियांचा सुगावा लागला. त्यांच्या माहितीवरूनच वन खात्याच्या चमूने बहेलियांचा म्होरक्या अजित राजगोंड ऊर्फ अजित पारधी याला अटक केली. राज्यातील २५ वाघांची शिकार झाल्याची माहिती आहे. यातील अधिकांश शिकारी या राजुरा, ब्रम्हपूरी, बल्लारपूर, गोंदिया परिसरांतील वाघांच्या आहेत. ज्या दीड-दोन वर्षांच्या कालावधीत या शिकारी झाल्या, त्या काळात वन खात्याचे सर्व अधिकारी वनस्पती उद्यानाच्या निर्मितीत गुंतले होते.

राज्यात २०१३ मध्ये वाघांच्या शिकारीचे सत्र उघडकीस आले. त्या वेळीसुद्धा बहेलियांनी या शिकारी केल्याचे समोर आले होते. त्यानंतर १५० शिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. ही कारवाईदेखील मेळघाट वन्यजीव गुन्हे शाखेमुळे शक्य झाली. यातील अनेक आरोपींना सात ते आठ वर्षांची शिक्षा झाली. विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयानेदेखील या शाखेच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. यानंतर वाघांच्या संरक्षणाबाबत मानक कार्यप्रणाली तयार करण्यात आली. ही कार्यपद्धती कागदावरच राहिली.

आणखी १६ आरोपींना अटक

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अजित राजगोंड ऊर्फ अजित पारधी यांच्यासह इतर सर्व आरोपींच्या वनकोठडीत वाढ करण्यात आली आहे. तेलंगणातील आसिफाबाद येथून आणखी १६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे सर्व बहेलिया टोळीतील शिकारी असल्याचे सांगण्यात येत आहे.

वनमंत्र्यांकडून प्रतिसाद नाही

याबाबत प्रतिक्रिया मिळवण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी गेल्या तीन दिवसांपासून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

Story img Loader