वर्धा : पूणे येथील प्रख्यात बजाज ऑटो लिमिटेड या उद्योग समूहाने उद्योग व शैक्षणिक क्षेत्रातील दरी भरून काढणारा ‘ बेस्ट ‘ उपक्रम पुरुस्कृत केला आहे. बेस्ट म्हणजे बजाज इंजिनीअरिंग स्किल्स ट्रेनींग होय. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना विकसित होत चाललेल्या उत्पादन तंत्रज्ञान क्षेत्रात आधुनिक कौशल्यसह सुसज्ज करण्याचा हेतू या प्रशिक्षण केंद्राचा आहे.
बजाज यांचे पालकत्व असलेल्या शिक्षा मंडळद्वारे संचालित बजाज इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी या महाविद्यालयात हे केंद्र सूरू करण्यात आले. विदर्भातील हे असे पहिलेच बेस्ट केंद्र असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष संजय भार्गव यांनी केले. अत्याधुनिक पायाभूत सुविधा व जागतिक दर्जाची उपकरणे यांनी सुसज्ज असे हे केंद्र जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यास विद्यार्थ्यांना सक्षम करणार. या केंद्रात पदवी व पदवीका स्तरावर प्रशिक्षण अभ्यासक्रम हे बजाज ऑटोच्या वरिष्ठ अभियंत्यांनी तयार केलेले आहेत, असे केंद्रप्रमुख डॉ. मनीष पासरकर यांनी सांगितले.
मॅकेट्रॉनिक्स, मोशन कंट्रोल, सेन्सर टेकनॉलॉजी, ए. आय, रोबोटिक्स असे एकूण ४० प्रगत अभ्यासक्रम शिकायला मिळणार आहे. हे अभ्यासक्रम प्रासंगिक गरज व व्यवहारिकता याची सांगड घालणारे आहेत. व्यावहारिक प्रशिक्षण, प्रकल्प आधारित कौशल्ये व उद्योग तज्ञाचे मार्गदर्शन राहील.प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर उद्योगातील संभाव्य रोजगाराशी समन्वय राहील. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी सहा तर पदवीका विद्यार्थ्यांसाठी चार महिन्याचा हा अभ्यासक्रम राहील.
बजाज महाविद्यालयाचे विद्यार्थी त्यांच्या आठव्या सेमिस्टरमध्ये तर इतर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी त्यांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर जुलै ते डिसेंबर दरम्यान अभयसक्रम पूर्ण करू शकतील.यावर्षी पहिल्या बॅचमध्ये महाराष्ट्रासह अन्य राज्यातील मिळून १२३ विदयार्थ्यांची नोंदणी झाली आहे. बजाज ऑटो समूह सुरवातीला ८० टक्के शिष्यवृत्ती प्रशिक्षणार्थिंना देणार. अत्यंत कमी शुल्कत हे प्रशिक्षण उपलब्ध होत असल्याचे संजय भार्गव म्हणाले.
तंत्रज्ञान क्षेत्रात हे अत्यंत प्रगत पाऊल असल्याचा दावा संस्थेने केला आहे. तयार विद्यार्थी हे आधुनिक तंत्र उपकरणे व सॉफ्टवेअर यांनी परिपूर्ण होणार असल्याने ते जगाच्या विद्यमान स्पर्धेस सहज सामोरे जाण्यास सक्षम ठरणार. प्राचार्य डॉ. नरेंद्र कान्हे यांनी सहकार्य प्राप्त झाल्याबद्दल बजाज ऑटो समूहाचे आभार मानले.तसेच विदर्भातील विद्यार्थ्यांना नौकरीच्या उत्तम संधी प्राप्त होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
बजाज ऑटो लिमिटेडचे समीर नाबर व पवनकुमार चव्हाण हे प्रशिक्षण कार्यक्रमाच्या शुभारंभास हजर होते.