वर्धा : सामाजिक दायित्वाच्या भावनेने जमनालाल बजाज सेवा ट्रस्ट विविध उपक्रम राबवित असतो. प्रामुख्याने ग्रामीण भागातील शिक्षण, शेतीविषयक विविध उपक्रम संस्थेतर्फे चालविण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी पिकांना पाणी आवश्यक ठरते. पिकपद्धत बदलून शेती करण्यासाठी सिंचनाची गरज भासते. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी असते, मात्र विहीर खोदण्यासाठी पैसा नसतो. कोरडवाहू शेतात एकच पीक घेता येत असल्याने कुटुंबाचे भागत नाही. दुसरीकडे विहीर खोदण्यासाठी शासनाच्या योजना काही अटीमुळे तो अंमलात आणू शकत नाही. यात ५ ते १५ एकरपर्यंत शेती असणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अश्याच शेतकऱ्यांना बजाज संस्था मदतीचा हात देणार आहे. शेतकऱ्यांना विहिरी मोफत खोदून देण्याचा उपक्रम बजाज सेवा संस्थेने हाती घेतला आहे.
त्याची सुरूवात समुद्रपूर तालुक्यातील दोन शेतकऱ्यांच्या विहिरी खोदून देत झाली आहे. या विहिरांना पाणी लागल्याने शेतकरी आनंदीत आहे. शासनाची अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी विहीर योजना आहे. मात्र पाच एकरावरील शेतकरी या योजनेस पात्र नाही. असेच एक शेतकरी समुद्रपूर तालुक्यातील वायगाव येथील बालाजी मारूती चांभारे हे आहे. त्यांच्याकडे असलेल्या सहा एकर शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. अधिक उत्पन्न मिळावे म्हणून त्यांनी शेत विहिरीसाठी शासनाकडे तीनवेळा अर्ज केला. परंतु तो नामंजूर झाल्याने ते हताश झाले होते. मात्र बजाज संस्था त्यांच्या मदतीला धावली. संस्थेने चाळीस फूट खोल विहीर खोदून दिली. तीन दिवसांत झालेल्या या कामासाठी १ लाख २० हजार रुपये खर्च आला. यात १० टक्के शेतकऱ्याचा तर ९० टक्के संस्थेचा सहभाग असतो. लाभार्थी चांभारे म्हणतात की आता विहीर झाल्याने वर्षातून दोन ते तीन पिके घेता येणार.
हेही वाचा – चंद्रपुरातील प्रदुषणात घट; काय सांगते वार्षिक आकडेवारी? जाणून घ्या…
u
े
बजाज संस्थेतर्फे वर्धा, सेलू, देवळी, हिंगणघाट व समुद्रपूर या पाच तालुक्यांत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ५ ते १५ एकरपर्यंत शेती असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात विहीर खोदून देण्याचा प्रयत्न आहे. सध्या एका गावात एका शेतकऱ्याला विहीर खोदून देण्याचा प्रयत्न आहे. त्यात पुढे आणखी वाढ केल्या जाईल, असे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भार्गव यांनी नमूद केले. शेतात विहीर झाल्यास सिंचन शक्य होणार असून त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल. तसेच रोजगार निर्मिती अपेक्षित असल्याचे भार्गव म्हणाले.