देशद्रोहाच्या आरोपामुळे चर्चेत असलेल्या ‘जेएनय’ूमधील कन्हैयाकुमार या विद्यार्थी नेत्याचा नागपूर दौरा आज दगडफेक, चप्पलफेक, भाषणात व्यत्यय, समर्थन व विरोधातील नारेबाजीने भलताच गाजला. या निमित्ताने डावे व उजव्यांचे राजकारण विद्यार्थ्यांना जवळून अनुभवायला मिळाले.
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू केंद्रीय विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी कन्हैयाकुमारला नागपुरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा देणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांने कन्हैयाकुमार भाषण द्यायला उठताच चप्पल फेकून मारली. मात्र, ती व्यासपीठावरील एका कार्यकर्त्यांने झेलून फेकणाऱ्याच्या दिशेने भिरकावली. त्यामुळे सभागृहाचे लक्ष त्या घटनेकडे वेधले गेले आणि गोंधळ उडाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त कन्हैयाचे व्याख्यान सुरू होताच हा गोंधळ उडाला. वेगवेगळ्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनांनी धनवटे नॅशनल महाविद्यालयाच्या सभागृहात कन्हैयाचे व्याख्यान आयोजित केले होते.
कार्यक्रमात चप्पल फेकणाऱ्याला जागेवरच पकडून सभागृहाच्या बाहेर काढत असताना दुसरीही चप्पल व्यासपीठाच्या दिशेने फेकण्यात आली तेव्हा व्यासपीठावरील आंबेडकरी आणि लाल सेनेचे कार्यकर्ते बजरंगदलाच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले.
अभाविपचे कार्यकर्ते १२ वाजल्यापासूनच सभागृहात आणि परिसरात फिरकत होते. उपस्थितांच्या तुलनेत ते फारच कमी असल्याने गर्दीत वेगवेगळ्या ठिकाणी दोनदोन कार्यकर्ते बसले होते. कन्हैयाचे भाषण सुरू होण्यापूर्वी सभागृहाच्या शेवटी बसलेल्या प्रेक्षकांनी आंबेडकरांचा विजय असो, जयभीमच्या आणि बजरंगदल व अभाविप मूर्दाबादच्याही घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यामुळे अभाविप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कन्हैयाच्या विरोधात घोषणा देत चप्पल भिरकावली. ती भिरकावणाऱ्यांबरोबर दलाच्या कार्यकर्त्यांना चोप देत सभागृहाच्या बाहेर काढण्यात आले.
पहिला गोंधळ निवळल्यानंतर पुन्हा कन्हैयाचे भाषण सुरू झाले. तो म्हणाला, ‘भारत माता की जय घोषणा दिल्या जातात. मात्र, भारत मातेची जाण असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा द्रष्टा नेता कोणी नाही. कारण महिलांच्या हक्कासाठी बाबासाहेबांनी मोठा त्याग केला आहे. मात्र, मोहन भागवत म्हणतात की महिलांनी घराच्या बाहेर पडू नये’. त्याने हे वाक्य उच्चारताच तोपर्यंत व्यासपीठावरील गर्दीत असलेल्या बजरंगदलाच्या एका कार्यकर्त्यांने जोडा भिरकावून दुसऱ्यांदा व्याख्यान उधळून लावण्याचा प्रयत्न केला.
बजरंगदल व अभाविपच्या कार्यकर्त्यांचा कन्हैयाला मारण्याचा डावही फसला. कन्हैयाकुमार याला भाषणासाठी आमंत्रित करण्याची चढाओढ लागली असताना तो किती गर्दी खेचेल याचा अंदाज आयोजनकर्त्यांना आला नाही. मात्र जेव्हा लोक मोठय़ा संख्येने सभागृहात आले तेव्हा व्यवस्था कोलमडली. शिवाय अनुचित प्रकार टाळण्यासाठी काही दरवाजे बंद तर काही दरवाज्यांमध्ये नागरिकांची गर्दी असल्याने पाय ठेवायलाही जागा नव्हती. अशा वातावरणात चेंगराचेंगरी होण्याचीच शक्यता होती. तत्पूर्वी सकाळी कन्हैयाकुमारला विमानतळावरून घेऊन येत असताना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सलील देशमुख यांच्या वाहनावर दगडफेक करून काच फोडले.

पत्रकारांना सुनावले
कन्हैयाला नागपुरात आणल्याच्या थाटात असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते पत्रकारांबरोबर वाद घालत होते. सभागृहात पाय ठेवायला जागा नसल्याने छायाचित्रकार आणि पत्रकार व्यासपीठावर चढले. यामुळे चिडलेल्या अनिल देशमुखांनी ‘पत्रकार असा नाही तर कोणीही असा’ अशा शब्दात सुनावले.

काँग्रेस- राष्ट्रवादीला टोला
आजकाल अनेक लोक बाबासाहेबांचे नाव घेतात, जयभीम म्हणतात, त्यांच्या नावाने स्मरणिका काढतात. मात्र, बाबासाहेब आत्मसन्मान, सामाजिक न्यायाविषयी आग्रही होते. ते ब्राम्हणशाही, जातीभेदाच्या, भांडवलशाहीच्या विरोधात होते. त्यामुळे केवळ त्यांचे नाव घेऊन चालणार नाही तर सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी ब्राम्हणवाद, भांडवलशाही, जातीभेदाच्या विरोधात उभे राहावे लागले, असे म्हणत कन्हैयाकुमारने उपस्थित काँग्रेसजनांना टोला लगावला.

‘राष्ट्रवाद’च्या नावावर मनुवादी व्यवस्था निर्माण करण्याचा डाव
‘राष्ट्रवादा’च्या नावावर अनावश्यक चर्चा घडविली जात आहे. राष्ट्रवादाच्या नावाखाली हिंदू राष्ट्रवाद आणि हिंदू राष्ट्रवादाच्या नावाखाली ब्राम्हणवाद लागू करण्याचा प्रयत्न आहे. राज्यघटना अस्तित्वात असेपर्यंत हे शक्य नाही. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची घटना कचरापेटीत टाकून या देशात पुन्हा ‘मनुस्मृती संविधान’ लागू करून मनुवादी व्यवस्था निर्माण करण्याचा डाव विद्यमान मनुवादी सरकारचा आहे, असा आरोप कन्हैय्याकुमार याने केला. ‘भारत माता की जय’ लोकांनी म्हणावे की नाही हा मुद्दा गौण आहे. देशात संसदीय लोकशाही असून लोकांच्या अधिकाराबाबत आणि देश हितासंदर्भात घटनेत सविस्तर मांडणी करण्यात आली आहे. लोकांनी काय घोषणा द्याव्यात, हे घटनेने स्पष्ट केले आहे. तरीही ‘भारत माता की जय’, ‘राष्ट्रवाद’, जातीभेद, गोमांस अशा मुद्यांवरून देशात तेढ निर्माण करण्यात येत आहे. हा एकप्रकारे लोकशाहीवर हल्ला आहे. लोकशाहीला दुसरा पर्यायच असू शकत नाही. त्यामुळे मनुवादी सरकारचा हा डाव हाणून पाडण्यासाठी आणि संसदीय लोकशाही पद्धतीवर विश्वास असणारे आणि विद्यमान व्यवस्थेतून राष्ट्रनिर्मिती करणारे पक्ष आपल्या पाठीशी उभे आहेत. आपण कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीचे सदस्यत्व स्वीकारले नाही किंवा त्यांना सहकार्य मागण्यासाठीही गेलेला, असेही त्याने यावेळी स्पष्ट केले.

म्हणूनच डॉ. आंबेडकर जयंतीवर पैसा खर्च
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्याा माध्यमातून प्रत्येकाला ‘एक व्यक्ती, एक मत आणि एक मूल्य’ दिले. त्यामुळे देशात राजकीय समानता निर्माण झाली. परंतु सामाजिक, आर्थिक समानता निर्माण होऊ शकली नाही. राजकीय समानतेमुळेच आज मनुवादी आणि ब्राम्हणवादी सरकारला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी पैसा खर्च करावा लागत आहे.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण कन्हैयाकुमार असल्याने वेळोवेळी व्यासपीठावरून खाली उतरण्याची विनंती करूनही कोणीही कार्यकर्ता, पत्रकार, छायाचित्रकार व्यासपीठाच्या खाली उतरण्यास तयार नव्हते. एनएसयूआय, आरपीआय सेक्युलर स्टुडंट, युवक काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, प्रगतिशील छात्र युवा संघर्ष समिती (विदर्भ), राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या तरुण कार्यकर्त्यांनी कन्हैयाला गराडा घातला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी, डाव्या पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी सभागृहातील पुढच्या रांगेत हजेरी लावली. महत्त्वाचे म्हणजे खचाखच भरलेल्या सभागृहात लोकांनी संयमाने काम घेतले. चप्पल फेकून मारल्याच्या घटनेनंतर सभागृहातील प्रेक्षकांनी धावपळ न करता मोबाईलच्या बॅटरीज लावून सभागृह प्रकाशमय केले.

समाजातील ठेकेदार संपविणे आवश्यक
दलित, आदिवासी, मागासवर्गीय, महिला अशा विविध गटाचे प्रतिनिधीत्व करण्याच्या नावाखाली समाजात अनेक ठेकेदार तयार झाले आहेत. समाज परिवर्तन आणि विकासासाठी लोकांना सर्वप्रथम ठेकेदारी पद्धत संपविली तरच दलित, पीडित, शोषित आणि आदिवासी हे संघटित होतील आणि आपल्या हक्कासाठी लढतील.

ढिसाळ आयोजन
काँग्रेस व राष्ट्रवादीसह लहान मोठय़ा सर्वच पक्षांनी कन्हैयाच्या लोकप्रियतेचा फायदा उठवण्यासाठी त्याचे व्याख्यान आयोजित केले खरे मात्र, त्यांचा अंदाज चुकला. अतिशय ढिसाळ आयोजन करण्यात आले. नेत्यांना बसायलाच जागा नव्हती. खुच्र्याची पहिली रांग आणि व्यासपीठाच्या मधील मोकळ्या जागेवर लोक उभे असल्याने व्यासपीठावर बसलेल्या कन्हैयाचा पूर्ण चेहराही दिसत नव्हता. बाहेरून खुच्र्या बोलावून त्यावर माजी खासदार विलास मुत्तेमवार, डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आणि धनवटे नॅशनल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन तायवाडे उपस्थित होते.

‘रामाच्या नावावर एकमेकांविरुद्ध लढवण्याचा संघाचा डाव’
या देशातील मनुवाद्यांना मुळात राम राज्य बनवणे किंवा बाबरी मशीद पाडण्यापेक्षाही त्यांना रामाच्या नावाने लोकांना एकमेकांच्या विरोधात लढवायचे आहे. त्यांना समाजाला तोडायचे असल्याची टीका जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी कन्हैया याने येथे केली. शिष्यवृत्ती किंवा इतर अभ्यासवृत्तीच्या द्वारे विद्यार्थ्यांवर खूप पैसा खर्च करण्यात येतो. असा कांगावा केला जातो. मात्र, अर्थसंकल्पातील एक तृतीयांश पैसा केवळ भांडवलदारांचे कर्ज माफ करणे आणि सोयी पुरवणाऱ्यांवर होतो. बाकी जनतेच्या वाटय़ाला अत्यल्प तरतुद केली जाते. मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर खर्च होणारा निधी वाया जात नाही तर ती उद्याची गुंतवणूक आहे. कारण शिकून नोकरीस लागणारा नोकरदार भविष्यात देशासाठी कर भरत राहतो. म्हणूनच केंद्रात मनुष्यबळ विकास मंत्रालय आहे, याची जाणीव कन्हैयाने करून दिली. नागपूर ही संघाची भूमिका नसून डॉ. आंबेडकरांची दीक्षाभूमी आहे. आजकाल खूप लोक डॉ. आंबेडकरांचे नाव घेतात, जयभीम म्हणतात. स्मरणिका काढतात. पण मुळात बाबासाहेबांना अपेक्षित असलेली सामाजिक न्यायाची लढाई ते लढत नाहीत. माझी आई धार्मिक होती. ती नेहमी ‘कण कण में राम बसते है’, असे म्हणायची. मात्र, संघाच्या लोकांनी बाबरचा बदला घेण्यासाठी बाबरी मशीद पाडली. त्यांनी रथ यात्रा काढली. कधी गरिबी संपवण्यासाठी किंवा जातीभेद संपवण्यासाठी यात्रा का नाही काढली. मुळात संघाला राम किंवा बाबरी मशिदीशी संबंध नसून त्यांना समाज तोडायचा असल्याचे कन्हैया म्हणाला.

Story img Loader