देशद्रोहाच्या आरोपामुळे चर्चेत असलेल्या ‘जेएनय’ूमधील कन्हैयाकुमार या विद्यार्थी नेत्याचा नागपूर दौरा आज दगडफेक, चप्पलफेक, भाषणात व्यत्यय, समर्थन व विरोधातील नारेबाजीने भलताच गाजला. या निमित्ताने डावे व उजव्यांचे राजकारण विद्यार्थ्यांना जवळून अनुभवायला मिळाले.
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू केंद्रीय विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी कन्हैयाकुमारला नागपुरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा देणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांने कन्हैयाकुमार भाषण द्यायला उठताच चप्पल फेकून मारली. मात्र, ती व्यासपीठावरील एका कार्यकर्त्यांने झेलून फेकणाऱ्याच्या दिशेने भिरकावली. त्यामुळे सभागृहाचे लक्ष त्या घटनेकडे वेधले गेले आणि गोंधळ उडाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त कन्हैयाचे व्याख्यान सुरू होताच हा गोंधळ उडाला. वेगवेगळ्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनांनी धनवटे नॅशनल महाविद्यालयाच्या सभागृहात कन्हैयाचे व्याख्यान आयोजित केले होते.
कार्यक्रमात चप्पल फेकणाऱ्याला जागेवरच पकडून सभागृहाच्या बाहेर काढत असताना दुसरीही चप्पल व्यासपीठाच्या दिशेने फेकण्यात आली तेव्हा व्यासपीठावरील आंबेडकरी आणि लाल सेनेचे कार्यकर्ते बजरंगदलाच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले.
अभाविपचे कार्यकर्ते १२ वाजल्यापासूनच सभागृहात आणि परिसरात फिरकत होते. उपस्थितांच्या तुलनेत ते फारच कमी असल्याने गर्दीत वेगवेगळ्या ठिकाणी दोनदोन कार्यकर्ते बसले होते. कन्हैयाचे भाषण सुरू होण्यापूर्वी सभागृहाच्या शेवटी बसलेल्या प्रेक्षकांनी आंबेडकरांचा विजय असो, जयभीमच्या आणि बजरंगदल व अभाविप मूर्दाबादच्याही घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यामुळे अभाविप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कन्हैयाच्या विरोधात घोषणा देत चप्पल भिरकावली. ती भिरकावणाऱ्यांबरोबर दलाच्या कार्यकर्त्यांना चोप देत सभागृहाच्या बाहेर काढण्यात आले.
पहिला गोंधळ निवळल्यानंतर पुन्हा कन्हैयाचे भाषण सुरू झाले. तो म्हणाला, ‘भारत माता की जय घोषणा दिल्या जातात. मात्र, भारत मातेची जाण असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा द्रष्टा नेता कोणी नाही. कारण महिलांच्या हक्कासाठी बाबासाहेबांनी मोठा त्याग केला आहे. मात्र, मोहन भागवत म्हणतात की महिलांनी घराच्या बाहेर पडू नये’. त्याने हे वाक्य उच्चारताच तोपर्यंत व्यासपीठावरील गर्दीत असलेल्या बजरंगदलाच्या एका कार्यकर्त्यांने जोडा भिरकावून दुसऱ्यांदा व्याख्यान उधळून लावण्याचा प्रयत्न केला.
बजरंगदल व अभाविपच्या कार्यकर्त्यांचा कन्हैयाला मारण्याचा डावही फसला. कन्हैयाकुमार याला भाषणासाठी आमंत्रित करण्याची चढाओढ लागली असताना तो किती गर्दी खेचेल याचा अंदाज आयोजनकर्त्यांना आला नाही. मात्र जेव्हा लोक मोठय़ा संख्येने सभागृहात आले तेव्हा व्यवस्था कोलमडली. शिवाय अनुचित प्रकार टाळण्यासाठी काही दरवाजे बंद तर काही दरवाज्यांमध्ये नागरिकांची गर्दी असल्याने पाय ठेवायलाही जागा नव्हती. अशा वातावरणात चेंगराचेंगरी होण्याचीच शक्यता होती. तत्पूर्वी सकाळी कन्हैयाकुमारला विमानतळावरून घेऊन येत असताना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सलील देशमुख यांच्या वाहनावर दगडफेक करून काच फोडले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा