नागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून राज्यात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान राबवले जात आहे. बसस्थानक स्वच्छ, सुंदर करण्यासाठी यंदा प्रथमच महामंडळाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महामंडळाने राज्यातील सगळ्याच विभाग नियंत्रक आणि बसस्थानक व्यवस्थापकांना दिलेल्या आदेशात, अभियानात स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्था, तरुण मंडळे, महाविद्यालयातील एन.सी.सी., एन.एस.एस., विद्यार्थी व लोकांचा सहभाग वाढवायला सांगितले आहे. सोबत सर्व बसस्थानकांवरील प्रसाधनगृह व स्वच्छतागृहांची सखोल स्वच्छता करायला सांगितले आहे.

हेही वाचा…भाजपाने चंद्रपुरात भाकरी फिरवली! हंसराज अहीर यांच्याऐवजी सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी

बसस्थानक परिसरातील दगडधोंडे, मातीचे ढिगारे, अनावश्यक झाडे-झुडपे, दीर्घकाळ साचलेला कचरा, स्थानकावरील छत, पंखे, उंच भिंती यावर साचलेल्या जाळी-जळमटे, स्थानकावरील बैठक व्यवस्था, फरशी, भिंतीचे कोपरे, सर्व कार्यालये फिनेल, ॲसिड टाकून ब्रशने धुवून घेत मॉपच्या सहाय्याने घासून स्वच्छ करणे, कंत्राटदाराकडून योग्य स्वच्छता करून घेण्यासह एसटीच्या चालक, वाहकासह इतर कर्मचाऱ्यांचेही विश्रांतीगृह, प्रसाधनगृहाची स्वच्छता करण्याचेही आदेशात स्पष्ट आहे.

प्रत्येकी ५ ते १५ हजारांचा निधी

अभियानाअंतर्गत सर्व बसस्थानकांचे वर्गीकरण केले गेले. त्यामुळे स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य उदा. झाडू, खराटा, ब्रश, ॲसिड, फिनेल, शांपू, कचरा- टोपल्या इत्यादी साठी बसस्थानकाच्या वर्गानुसार महामंडळ निधी देईल. त्यानुसार ‘क’ वर्गाच्या बसस्थानकासाठी ५ हजार रुपये, ब वर्गासाठी १० हजार तर अ वर्गासाठी १५ हजार रुपये महामंडळ देईल. या अभियानाअंतर्गत सर्वात स्वच्छ व सुंदर बसस्थानकांना वर्गानुसार पुरस्कारात निधी दिला जाणार आहे.

हेही वाचा…“भाजपाकडून हिंदुत्वाच्या केवळ गप्पा,” उद्धव ठाकरेंचा घणाघात; म्हणाले, “त्यांना शिवसेनाप्रमुखांनी…”

बसस्थानक स्वच्छ व सुंदर करून लोकांना ते आपलेसे वाटावे म्हणून एसटीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी ही अभिनव योजना सुरू केली. त्यातून राज्यातील प्रवाशी एसटीकडे आणखी आकर्षित होण्यास मदत होईल. -श्रीकांत गभणे, उपमहाव्यवस्थापक, एसटी महामंडळ, नागपूर.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb thackeray clean bus station abhiyan msrtc stations going to clean through people participation mnb 82 psg