काँग्रेस नेते, माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आज ( २६ नोव्हेंबर ) पहाटे सेमिनरी हिल्स परिसरात मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेले होते. तेव्हा, बाळासाहेब थोरात पाय घसरून पडले. यामध्ये त्यांच्या हाताचे हाड मोडलं आहे. त्यांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथे दाखल करण्यात आलं आहे. तेथे सर्व तपासण्या झाल्यानंतर त्यांना मुंबईला हलवण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली.
थोरात यांना जखमी अवस्थेत अधिवेशनासाठी तैनात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथम तपासले होते. मेयोच्या आकस्मिक विभागात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. तातडीने सिटी स्कॅन, एम.आर.आय.सह इतर तपासण्या केल्या गेल्या. त्यात उजव्या हाताचे हाड मोडल्याचे स्पष्ट झालं आहे.
नातेवाईकांनी बाळासाहेब थोरतांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांच्या परवानगीने मेयोतून सुटी घेऊन नागपूर विमानतळावर हलवण्यात आलं. दरम्यान, मेयो रुग्णालयात त्यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रणिती शिंदे, यशोमाती ठाकूर यांनी बाळासाहेब थोरातांची भेट घेतली आहे.