बाळासाहेबांची शिवसेना पक्षात अल्पावधीतच अंतर्गत कलह निर्माण झाला आहे. विकास निधीवरून पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. अकोला जिल्ह्यातील पक्षाचे संपर्कप्रमुख व माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या विरोधात काही पदाधिकाऱ्यांनी खासदार प्रतापराव जाधव यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार केली. यावर हे बदनामीचे षडयंत्र असल्याचे सांगून गोपीकिशन बाजोरिया यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
हेही वाचा- “संजय राऊत हे जगातील आठवे अजुबे”; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला; म्हणाले, “ते तर…”
बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष अस्तित्वात येऊन काही महिन्यांचा कालावधी झाला. हा पक्ष अकोला जिल्ह्यात पाय रोवण्याचे प्रयत्न करीत आहे. दरम्यान, आता पदाधिकाऱ्यांच्या ‘लेटरबॉम्ब’ने पक्षातील अंतर्गत वाद समोर आले आहेत. गोपीकिशन बाजोरिया यांच्या विरोधात पक्षात असंतोष पसरला आहे. त्यांच्या विरोधात पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अकोला जिल्ह्यातील विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी दिला. आता पुन्हा २० कोटी निधी मिळवण्यासाठी माजी आमदार बाजोरिया यांनी पत्र दिले.
हेही वाचा- ऐकलं का? गोंदियाच्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात नवे पाहुणे येणार; वाचा कोण ते…
बाजोरिया यांच्याकडून विकास निधीचा दुरुपयोग होत असल्याचा या आरोप पत्रात करण्यात आला आहे. पक्षातील कोणत्याही पदाधिकाऱ्याला विश्वासात न घेता त्यांची कामे रद्द करून पडीक मालमत्ता असलेल्या ठिकाणी नाल्यांची कामे दिल्याचे त्यात म्हटले आहे. निधीसाठी दिलेल्या पत्राची शहानिशा करावी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच निधी वितरित करावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या पत्रावर बाळासाहेबांची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना वाढू नये म्हणून हे षडयंत्र रचले जात आहे. त्या पदाधिकाऱ्यांना निधी दिला होता, कामे झालीत त्याच ठिकाणी त्यांनी पुन्हा निधी मागितला. त्यामुळे ते काम रद्द झाले. निधीचा गैरवापर किंवा दुरुपयोग होण्याचा प्रश्नच येत नाही, असे गोपीकिशन बाजोरिया यांनी म्हटले आहे.