गोंदिया:– बलिप्रतिपदा ठिकठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यानिमित्ताने गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी, गोपालक, आदिवासींनी त्यांच्या गोधनाची पूजा केली, त्यांच्या वाजतगाजत मिरवणुका काढल्या.बलीप्रतिपदेच्या दिवशी विविध पध्दतीने गोधनाची पूजा सर्वत्र केली जाते. रानावनात चारण्यासाठी नेण्याचे काम पूर्वी गोवारी समाजातील नागरिक करत होते . त्यामुळे हा दिवस त्यांच्यासाठी खास असतो. गाईला अंघोळ घालून त्यांची रंगरंगोटी केली जाते. गावात जनावरांची मिरवणूक काढून अंगणात ठेवलेले शेणाचे गोधन गाईच्या पावलाने उधळले जाते.
खिल्या मुठया देवस्थानात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवत गोवारी समाजातर्फे गायगोधन कार्यक्रमाची उत्साहात सांगता झाली. पूजेच्या वेळी समाज बांधवांनी भगवान निसर्गदेवता खिल्यामुठयाचे पूजन केल्यानंतर आखर बांधण्यात आला. त्यानंतर गाय गोधनाचा कार्यक्रमात गाई वासरांना खेळविण्यात आले. लक्ष्मीपूजनाचा दुसरा दिवस म्हणजे गायगोधन. मात्र एक दिवस खंड पडल्याने मंगळवारी बलीप्रतिपदा व गायगोधन साजरा करण्यात आला. या दिवशी लोक मोठ्या आस्थेने गोवर्धन पूजा करतात. लोककलेची संस्कृती आणि आस्थेने दर्शन यावर्षीही गोवर्धन पूजेच्या निमित्ताने ग्रामीण भागात पहायला मिळाले.
हेही वाचा >>>नागपूर: गोरेवाड्यातील पर्यटकांची सुरक्षितता धोक्यात! बाहेरील बिबट्याचा प्राणीसंग्रहालयात प्रवेश
ही पूजा ग्रामीण भागात प्रामुख्याने केली जाते. या पूजेला सर्व गावातील गोमाता, गाय, बैलांचे शेण गोळा करून गावातील आकरावर मध्यभागी जमा होतात. या शेणामध्ये जिवंत कोंबडीचे पिल्लू ठेवले जाते. त्यानंतर मातीचे बैल, गाय, म्हैस, शेळी प्राणी तयार करून गोवर्धन पूजेच्या ठिकाणी एकत्र करतात. नंतर भूत गांजा नावाचे गवत वनस्पती ठेवतात. सायंकाळच्या सुमारास सर्व गावकरी गावातील गुरे-ढोरे त्याना शेण, गवतावरून नेताना शेण (गोवर्धन) पूजन केली जाते. यावरून सर्व गुरे हाकलली जातात. ग्रामीण भागामध्ये गोवर्धन पूजेची परंपरा जोपासण्यात आली. खेड्यापाड्यामध्ये मंडई या कार्यक्रमाचे आयोजनाला सुरूवात , होते. यादरम्यान नाटकाचे आयोजन केले जाते. दंडारीचे आयोजन केले जाते, एक सामाजिक संकल्प बांधून एकोपा निर्माण करणे हा महत्त्वाचा भाग आहे. हीच समाज संस्थेची खरी संपत्ती समजली जाते. गोंदिया जिल्ह्यात अद्याप पर्यंत धान खरेदी केंद्रे सुरू न झाल्यामुळे आर्थिक चणचण मुळे शेतकऱ्यांमध्ये फारसा उत्साह नसला तरी या सणाची परंपरा यावर्षीही मात्र कायम असल्याचे दिसून आले.