चंद्रपूर: भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री तथा बल्लारपुरचे आमदार सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार यांच्यात जणुकाही स्पर्धा सुरू झाली आहे. जोरगेवार यांनी १० जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीचे निमित्त साधून चंद्रपुरात आणले तर लगेच सहा दिवसांच्या अंतराने मुनगंटीवार यांनी पर्यावरण परिषदेचे उद्घाटनासाठी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना आणले. या दोघांमधील स्पर्धा व व्दंदाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.विशेष म्हणजे भाजपच्या या दोन्ही आमदारांनी एकमेकांच्या कार्यक्रमाला जाण्याचे कटाक्षाने टाळले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणुकीत या जिल्ह्यात भाजपाचे पाच आमदार निवडून आले आहेत. या पाच पैकी माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विविध कार्यक्रमांच्या आयोजनाच्या माध्यमातून धडाका सुरू केला आहे तर त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आमदार जोरगेवार यांनीही कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. या दोघांमध्ये एकप्रकाची स्पर्धा बघायला मिळत आहे.

हेही वाचा >>>गोंदिया-गंगाझरी दरम्यान गर्डर लॉन्चिंग ड्रिल…प्रवासी गाड्या उद्यापासून…

दहा वर्षापूर्वी भाजपात असलेले जोरगेवार सर्व पक्ष फिरून आल्यानंतर पून्हा भाजपात दाखल झाले व आमदार झाले. भाजपाचे आमदार म्हणून पहिलाच कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घेतला. कॉग्रेस नेते तथा चंद्रपूरचे सुपूत्र माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा.सा. कन्नमवार यांच्या शतकोत्तर रजत जयंती महोत्सवाचे निमित्त साधून मुख्यमंत्री फडणवीस यांना चंद्रपुरात आणले. विशेष म्हणजे जोरगेवार यांनी या संपूर्ण कार्यक्रमाला राजकीय स्वरूप दिले. त्यामुळे जोरगेवार यांच्यावर टिकाही झाली. फडणवीस चंद्रपुरात आले, आता पदरात काहीतरी पाडून घ्यायचे म्हणून जोरगेवार यांनी महाकाली महोत्सव समितीच्या माध्यमातून मंदिर परिसरात कार्यक्रम घेतला. मात्र मुख्यमंत्र्यांनी जोरगेवार यांच्या एकाही मागणीच्या पूर्ततेचे आश्वासन दिले नाही. आताही जोरगेवार विविध क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रम घेवून एकप्रकारे मुनगंटीवार यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करित आहेत.

हेही वाचा >>>नागपूर: ‘या’ नव्या संशोधनामुळे सौर उर्जा प्रकल्प स्वस्त होणार, दीपमाला साळी यांनी…

मुख्यमंत्री चंद्रपुरात आल्यानंतर मुनगंटीवार मागे राहिले नाही. त्यांनीही राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांना चंद्रपुरात आणले. निमित्त होते पर्यावरण परिषदेचे. या परिषदेचे उदघाटन १६ जानेवारी रोजी महामहीम राज्यपाल यांनी केले. एसएनडीटी विद्यापीठाच्या माध्यमातून तसेच विविध संस्थांँच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. परंतु या सर्व कार्यक्रमाचे नियोजन मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात झाले. हा कार्यक्रम राजकीय होवू नये याची दक्षता मुनगंटीवार यांनी घेतली. विशेष म्हणजे समाजातील विविध घटकांनाही या कार्यक्रमात मुनगंटीवार यांनी सहभागी करून घेतले. तसेच कार्यक्रमाच्या मंचाला देखील राजकीय गंध लागू दिला नाही. विशेष म्हणजे या कार्यक्रमा पाठोपाठ मुनगंटीवार आता आरोग्य व शेती विषयक कार्यक्रम देखील घेणार आहेत. दरम्यान भाजपाचे पाच आमदार या जिल्ह्यात आहे. मात्र मंत्री नाही. मंत्रीपद मिळाले नाही याचे दु:ख माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आहे. मात्र मी नाराज नाही, यातून आणखी काही चांगले घडेल असा आशावाद त्यांना आहे. याउलट पाच आमदार आहे म्हणजे मंत्रीपद मिळालेच पाहिजे असे काही नाही असे आमदार जोरगेवार यांना वाटते. मात्र हेच जोरगेवार मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात हळूच वारांकडे लक्ष ठेवा असेही सांगतात. यातूनच जोरगेवार यांच्या मनात नेमके काय आहे हे उघड आहे.

 भाजपाच्या या दोन आमदारांमध्ये कार्यक्रमाची स्पर्धा सुरू असतांना जिल्ह्यातील भाजपाचे तीन आमदार शांत बसले आहेत. त्यामुळे या दोन आमदारांमधील स्पर्धा लोकांमध्ये चर्चोचा विषय ठरली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ballarpur mla sudhir mungantiwar and mla kishore jorgewar also attended the inauguration rsj 74amy