चंद्रपूर: अयोध्येतील श्रीरामाचे मंदीर, नवीन संसद भवन, जी-२० शिखर परिषदेसाठी तयार केलेला भारत मंडपम, अशा एक ना अनेक नामांकित प्रकल्पांना बांधून ठेवणारा एक समान धागा चंद्रपूर जिल्ह्याचा आहे. तो म्हणजे या सर्व प्रसिध्द इमारतींमध्ये बल्लारपूर येथील सागवान लाकडाचा उपयोग करण्यात आला आहे. यात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. भारतातील सर्व नागरिकांना न्याय देणारी सत्तेची सर्वोच्च खुर्ची बल्लारपूरच्या लाकडाची राहणार आहे, याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे, अशा भावना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बल्लारपूर येथे महाराष्ट्र वनविकास महामंडळातर्फे पंतप्रधान कार्यालयाकरिता काष्ठ रवानगी करतांना वनमंत्री श् मुनगंटीवार बोलत होते.मुनगंटीवार म्हणाले, देशाच्या सर्वोच्च नेत्यासाठी बल्लारपूर येथून काष्ठ पाठवित आहोत, हा चंद्रपूर जिल्हा, बल्लारपूर आणि वनविभागासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे. बल्लारपूरच्या लाकडापासून तयार होणा-या खुर्चीवर बसून पंतप्रधान बसणार आहेत . पंतप्रधान कार्यालयासाठी ३०१८ घन फूट लाकूड दिल्लीला जात आहे.

हे ही वाचा… Sanket Bawankule Nagpur Accident: ‘अपघातानंतर संकेत बावनकुळेला प्रत्यक्षदर्शींनी चोप दिला’, सुषमा अंधारेंनी केले अनेक धक्कादायक आरोप

केवळ पंतप्रधानांचे कार्यालयच नव्हे तर केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीचे सभागृह, विविध देशांसोबत जेथे करार केले जातात तेथील खुर्च्या आणि संपूर्ण फर्निचर बल्लारपूरच्या लाकडापासून तयार होणार आहे. चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेत तयार करण्यात आलेला ७ फुटांचा तिरंगा ध्वज आजही पंतप्रधान कार्यालयात डौलाने उभा आहे, असे वनमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले. प्रास्ताविक एफडीसीएमचे व्यवस्थापकीय संचालक संजीव गौड यांनी केले. संचालक प्रज्ञा जीवनकर आणि कल्पना चिंचखेडे यांनी तर आभार सहायक व्यवस्थापक गणेश मोटकर यांनी मानले.

या कार्यालयात होणार

बल्लारपूरच्या सागवान काष्ठचा वापर पंतप्रधान कार्यालय, संमेलन कक्ष, द्विपक्षीय चर्चा कक्ष, कॅबीनेट सभा कक्ष, पंतप्रधान यांचे प्रधान सचिव यांचे कार्यालय.सागवान काष्ठ पुरविण्यात आलेले नामांकित प्रकल्प अयोध्या येथील श्रीराम मंदीर, नवीन संसद भवन, उपराष्ट्रपती भवन, भारत मंडपम, केंद्रीय सचिवालय, सातारा सैनिक शाळा, दादरा नगर हवेली वनविभाग, नवी मुंबई येथील डी.वाय.
पाटील स्टेटीयम, नाशिक येथील मध्यवर्ती कारागृह.

हे ही वाचा…चंद्रपूर: विजेचा धक्का लागून चार शेतकऱ्यांच्या मृत्यूने खळबळ, काय घडले?

वनविभाग व एफडीसीएमचे विशेष कौतुक

फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र (एमडीसीएम) चा थेट संबंध रोजगाराशी येतो. त्यासाठीच तडाळी येथे १० एकर जागेवर रोजगार निर्मिती आणि प्रशिक्षणाचे केंद्र उभे राहत आहे. एफडीसीएम ने नुकताच गत चार वर्षातील सर्वाधीक ५ कोटी ८२ लक्ष रुपयांचा लाभांश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला आहे. वनविभागात काम करणारा प्रत्येक वनरक्षक, वनमजूर, एफडीसीएमचे सर्व कर्मचारी आणि अधिकारी विशेष कौतुकास पात्र आहे.

हे ही वाचा…वर्धा : तो अनाथ, ती दिव्यांग ! प्रेमाच्या आणाभाका आणि कुटुंबाचा विरोध झुगारून शुभमंगल.

बांबुच्या धाग्यासाठी ससमिरा कंपनीसोबत करार

सर्वोत्तम कपडे बांबुच्या धाग्यापासून तयार होतात. याची जगभरात मागणी वाढत आहे. त्यामुळेच २९ कोटी रुपयांचा पहिला प्रकल्प चंद्रपुरात साकारण्यात येणार असून त्यासाठी केंद्र सरकारच्या ससमिरा कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. या माध्यमातून बल्लारपूर, चंद्रपूरचे नाव जगात जाईल, अशी अपेक्षा वनमंत्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ballarpur teak wood used in ram mandir ayodhya temple new sansad bhavan prime minister office rsj 74 sud 02