लोकसत्ता टीम

चंद्रपूर : बल्लारपूर विधानसभा मतदार संघ काँग्रेसच्या तर अनुसूचित जातीसाठी राखीव चंद्रपूर मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाला सुटला आहे. त्यामुळेच अपक्ष आमदार किशोर जोरगेवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या भेटीला बुधवारी सकाळी मुंबईला रवाना होणार आहे. दरम्यान बुधवारी जोरगेवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होवू शकतो अशीही शक्यता आहे.

या जिल्ह्यातील चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, ब्रम्हपुरी, चिमूर व वरोरा या सहा मतदार संघापैकी बल्लारपूर मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी स्वत:साठी मागितला होता. या मतदार संघातून काँग्रेस सलग तीस वर्षापासून सातत्याने पराभूत होत आली आहे, तेव्हा राष्ट्रवादीने हा मतदार संघ स्वत:कडे घ्यावा अशी गळ वैद्य यांनी शरद पवार यांच्याकडे घातली होती. तर शिवसेना उध्दव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुख संदघप गिऱ्हे यांच्यासाठी हा मतदार संघ शिवसेनेच्या कोट्यात द्यावा अशी मागणी आघाडीच्या बैठकीत केली होती. मात्र मुंबईत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना नेत्यांच्या बैठकीत बल्लारपूर मतदार संघ हा काँग्रेसकडे कायम राहणार, असा निर्णय झाला अशी माहिती विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार व काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी दिली.

आणखी वाचा-‘मी २८ तारखेस भाजपतर्फे अर्ज भरणार’ या उमेदवाराने स्वतःच केले जाहीर…

दरम्यान बल्लारपूर काँग्रेसकडे आहे, चंद्रपूर मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावा अशी मागणी शरद पवार यांनी केली. त्यानुसार आघाडीच्या बैठकीत चंद्रपूर मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याचा निर्णय जवळपास झालेला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. हा मतदार संघ राष्ट्रवादीकडे येणार असल्याची माहिती येताच चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार बुधवारी सकाळी मुंबईला रवाना झाले आहे. मुंबईत आमदार जोरगेवार राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे सर्व काही व्यवस्थित झाले तर आमदार जोरगेवार मुंबईतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्याचीही शक्यता आहे.

चंद्रपूर मतदार संघ हा सुरूवातीपासून काँग्रेस पक्षाकडे होता. १९९५ मध्ये भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांनी तत्कालीन राज्यमंत्री श्याम वानखेडे यांचा पराभव केला. त्यानंतर २०१९ पर्यंत हा मतददार संघ भाजपाकडे होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जोरगेवार यांनी भाजपाचे नाना शामकुळे यांचा पराभव केला. सलग ३० वर्षापासून या मतदार संघात काँग्रेस पराभूत होत आली आहे. त्यामुळेच काँग्रेसने हा मतदार संघ सोडावा असा युक्तीवाद आघाडीच्या बैठकीत झाला व काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी त्याला किंचितही विरोध केला नाही. परिणामी चंद्रपूर मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला आहे. यासंदर्भात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना विचारले असता, चंद्रपुरबाबत अंतिम निर्णय झालेला नाही, चर्चा सुरू आहे. सध्या आम्ही ब्रेक घेतला असून ब्रेकनंतर पून्हा चंद्रपूरबाबत चर्चा होईल असे सांगितले.

आणखी वाचा-‘दाना’ चक्रीवादळाचा धोका! कोणी दिले हे नाव, काय आहे अर्थ?

झोडे व अंभोरेंवर कार्यालय बंद करण्याची नामुष्की

काँग्रेस पक्षाकडून चंद्रपुर मतदार संघातून प्रविण पडवेकर, राजू झोडे, डॉ. दिलीप कांबळे, सुधाकर अंभोरे यांनी उमेदवारी मागितली आहे. त्यात मूळचे बल्लारपूरचे रहिवासी असलेल्या राजू झोडे व सुधाकर अंभोरे यांनी वाजत गाजत चंद्रपुरात कार्यालय सुरू केले. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या दोघांच्याही कार्यालयाचे उदघाटन केले. आता चंद्रपुरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्याने झोडे व अंभोरे यांच्यावर कार्यालय बंद करण्याची नामुष्की ओढवली आहे.