चंद्रपूर : माझा मुलगा खासदार बाळू धानोरकर याचा मृत्यू घातपताचा प्रकार आहे. या संशयास्पद मृत्यूची चौकशी करावी अशी मागणी त्यांची आई वत्सला धानोरकर यांनी केली आहे. वत्सला धानोरकर यांनी विषप्रयोगाचा संशय व्यक्त केला असून मृत्यूनंतर उत्तरीय तपासणी देखील केली नाही अशीही माहिती दिली. दरम्यान, त्यांच्या बोलण्याचा कल नेमका कुणाकडे आहे याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या मातोश्री वत्सला धानोरकर यांनी काही माध्यमांशी बोलताना मुलाच्या मृत्यूवर भाष्य केले. खासदार बाळू धानोरकर हा लहान सहान व्यक्ती नव्हता. त्यामुळे त्याच्या मृत्यूची चौकशी होणे आवश्यक आहे. तेव्हा आम्ही सर्व कुटुंब दुःखात होतो. त्यामुळे तेव्हा याविषयावर काही बोलता आले नाही.
हेही वाचा – विरोधकांच्या डोक्याचे नट कसण्यासाठी मी राणांचा पाना… फडणवीसांकडून जोरदार….
मुलाच्या मृत्यूच्या दोन दिवसांपूर्वी पतीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे माझी स्थिती बरोबर नव्हती. खासदार मुलगा व पतीचा मृत्यू एकापाठोपाठ आल्याने मनात असंख्य वेदना व दुःख होते. मुलाचा मृतदेह बघितला तेव्हा मला संशय आला. मात्र, दुःखात तेव्हा मी काही बोलू शकली नाही. तेव्हा पोस्टमार्टम करायला हवे होते. मात्र ते केल्या गेले नाही. त्याला काहीतरी दिले गेले असावे अथवा विष प्रयोग केला गेला असावा असाही संशय त्यांनी बोलून दाखविला.
मुलगा एवढा मोठा माणूस झाल्यावर अशा प्रकारे मृत्यू आल्याने मनाला खूप वाईट वाटले असेही त्या म्हणाल्या. दरम्यान त्यांच्या बोलण्याचा रोख कुणाकडे आहे याची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे मोठे बंधू वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांची आई त्यांचा प्रचार करीत आहेत. आजही त्या प्रचारात सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अनिल धानोरकर यांना काँग्रेसची उमेदवारी मिळू नये यासाठी पूर्ण शक्ती खर्च केली व लाडका भाऊ प्रवीण काकडे यांना उमेदवारी दिली.
हेही वाचा – मतदान झाल्याबरोबर सरकारी योजनांचा खरा चेहरा…. शरद पवारांनी सांगितले भविष्यात काय घडणार?
विशेष म्हणजे, प्रवीण काकडे दिवंगत बाळू धानोरकर यांचा वारसा सांगत मते मागत आहेत. त्यामुळे वरोरा मतदारसंघात निवडणूक चुरशीची झाली आहे. अशातच दिवंगत खासदाराच्या मृत्यूबद्दल त्यांच्या मातोश्रीनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.