चंद्रपूर : मुंबईच्या फोर्ट परिसरातील चाललेल्या काला घोडा कला महोत्सवात चंद्रपूरसारख्या आदिवासी भागातील बांबूच्या कलाकृती लोकप्रिय ठरल्या. त्यात बांबू दागिन्यांचे मुंबईकरांना अक्षरशः वेड लागल्याचे दिसून आले. चंद्रपूरच्या बांबू कलावंत आणि बांबू कार्यकर्त्या मीनाक्षी मुकेश वाळके यांना यशवंतराव चव्हाण सेंटर च्या यशस्विनी उपक्रमातून संधी मिळाली. त्याचे सोने झाल्याची प्रतिक्रिया वाळके यांनी लोकसत्ता शी बोलताना दिली.
दरम्यान शुक्रवारी रात्री राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांच्या पर्यावरण टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल, चित्रपट दिग्दर्शक जयंत सोमलकर, निर्मात्या शेफाली भूषण यांनीही भेट दिली असे त्या म्हणाल्या. मीनाक्षी या बांबू प्रशिक्षणाद्वारे आदिवासी आणि वंचित महिलांना सक्षम बनवत आहे. त्या गोंडवाना विद्यापीठात ‘बांबू’ विषयाच्या अभ्यागत प्राध्यापक आहेत. बांबूच्या राख्या, कीचेन, दिवे, तोरण, गणेश मूर्ती, तिरंगा ध्वज यांची देश आणि जगभरात निर्यात करतात. त्यांनी देशातील पहिले बांबू क्यू आर कोड स्कॅनर डिझाइन केले आहे. काला घोडा कला महोत्सवात मिनाक्षी यांच्या बांबुच्या ईतर कलाकृती सोबतच दागिने हे विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले. अनोख्या संकल्पनांनी बांबूला सुंदर दागिन्यांमध्ये रूपांतरित करण्याच्या शैलीने मुंबईकर महिलांना वेड लागले. . हार, झुमके, बांगड्या इत्यादी दागिने विशेष राहिले.जागतिक दर्जाच्या “मिस क्लायमेट” सौंदर्य स्पर्धेसाठी बांबूचा मुकुट डिझाइन करणाऱ्या मीनाक्षी वाळके म्हणाल्या की, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या यशस्विनी उपक्रमामुळे त्या इथपर्यंत पोहोचू शकल्या. दुर्गम भागातल्या दर्जेदार कलावंतांना शासनाने या ठिकाणी येण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, असेही त्या म्हणाल्या.
साहित्य संस्कृती मंडळाने घ्यावे बांबूचे पालकत्व
शासनाने बांबू या विषयाचा अभ्यासक्रमात समावेश करावा. हा विषयही ‘Earn while Learn’ शी जोडला गेला पाहिजे. मुलींसाठी हे प्रभावी ठरेल. सरकारने बांबू साहित्याला प्रोत्साहन द्यावे, यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने त्याचे पालकत्व स्वीकारावे असेही मीनाक्षी म्हणाल्या. गेल्या सत्तर वर्षात बांबू विषयांवर दहा एक पुस्तकेच येऊ शकली असेही त्या म्हणल्या. मिनाक्षी यांनी भारताचा फक्त बांबू वरील स्वतंत्र कवितांचा संग्रह आणला हे विशेष!
सचिन तेंडुलकर यांना एम्बेसिडर करा
पेटा सारख्या संस्था ब्रँड ॲम्बेसेडर आणि विविध सेलिब्रेटींद्वारे पर्यावरणविषयक कामासाठी समाजाला प्रेरित करतात, त्याच धर्तीवर बांबू क्षेत्रासाठीही केले पाहिजे. मीनाक्षी वाळके यांनी सचिन तेंडुलकर यांना बांबूचा ब्रँड ॲम्बेसेडर बनवण्याची इच्छाही व्यक्त केली. त्या म्हणाल्या, बांबूला फ्युचर मटेरियल म्हटले जाते. भारताला हे भविष्य घडवायचे असेल तर नियोजित शासनाधार मिळाला पाहिजे. ध्येय धोरणे ठरवताना तळागाळातील बांबू कारागिर कार्यकर्त्यांना प्राधान्य द्यावे लागेल. चंद्रपुरात गेल्या बारा वर्षांपासून बांबू संशोधन केंद्र आहे. मात्र त्यात एकही संशोधन झाले नाही. प्रशिक्षणात दर्जा नाही. यासाठी कृषि आणि तंत्र विद्यापीठाशी या केंद्राची नाळ जोडली जावी अशी अपेक्षाही वाळके यांनी व्यक्त केली.