सुमारे ५० प्रतिनिधींचा सहभाग
महाराष्ट्राचे बांबू धोरण ठरवण्यासाठी सूचना करण्याकरिता विदर्भ बांबू मिशनच्यावतीने आयोजित महाराष्ट्र बांबू परिषदेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. नागपूर येथे आयोजित या परिषदेत एका व्यक्तिमागे हजार लोक राहतील असे संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे ५० बांबू प्रतिनिधी होते. विशेष म्हणजे या परिषदेत समितीच्या सदस्यांनी नव्हे तर राज्यातून आलेल्या इतर प्रतिनिधींनी सादरीकरण केले. येत्या २६ डिसेंबपर्यंत ही समिती सरकारला त्यांच्या शिफारसी सादर करणार आहे.
बांबू धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि उपाययोजना सुचविण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली.
समितीच्या उपाध्यक्षपद वनखात्याचे सचिव विकास खारगे तर सदस्य म्हणून प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन), गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक, सामाजिक कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल, संपूर्ण बांबू केंद्र लवादाचे सुनील देशपांडे, वेदचे सुनील जोशी, संजय करपे, राजेश येडके, वैभव काळे, सुनील पांडे यांची नियुक्ती करण्यात आली. या समितीला राज्याला बांबूसंदर्भात धोरण ठरवण्यासाठी काही सूचना करण्यासाठी म्हणून नागपूर येथे महाराष्ट्र बांबू परिषद आयोजित करण्यात आली. कोल्हापूर, पुणे, कोकण, गडचिरोली, मेळघाट, चंद्रपूर, भंडारा, नागपूर येथून लोक सहभागी झाले होते. दुपारी दोन वाजता सुरू झालेली ही परिषद तब्बल पाच तास चालली. यात सुमारे १३ सादरीकरण करण्यात आले.
बांबूला उद्योजक वर्गात का टाकावे, असा मुद्दा या परिषदेत चर्चेला आला. तसेच बांबूला ऊर्जेसाठी वापरावे, कमीतकमी सहकार्य किंमत जाहीर करावी, व्ॉट आणि टॅक्सपासून बांबूला मोकळे करावे, बांबूसाठी बँकेचे कर्ज मिळावे, बांबू कारागिरांना कार्ड देण्याची प्रक्रिया गतिशील करावी, बांबू कापण्याचे प्रशिक्षण देण्यात यावे आदी मुद्दे चर्चेला आले. समितीच्या सदस्यांनी परिषदेत स्वत:ची मते न मांडता अन्य लोकांना बोलण्याची संधी दिली.
देवाजी तोफा, विजय देठे, अ‍ॅड. लालसू नरोटी, अ‍ॅड. हेमंत बेडेकर, राजेंद्र सपकाळ, आनंद कोलते, प्रताप गोस्वामी, आनंद फिस्के, चिंचोळकर, प्रभूदास चव्हाण आदींनी बांबू कला, प्रशिक्षण, उर्जा, अर्थकारण आदींवर सादरीकरण केले. अजय डोळके, वनपाल सलीम, शंकरराव ताम्हण, मोडक यांच्यासह समितीचे सदस्य मोहन हिराबाई हिरालाल, सुनील देशपांडे, सुनील जोशी आदी मान्यवर सहभागी होते.
परिषदेच्या समापन सोहळयाला व्ही. गिरीराज, विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक सिन्हा उपस्थित होते. यावेळी सिन्हा यांनी या संपूर्ण परिषदेचा वृत्तांत मागितला. व्ही. गिरीराज, विकास खारगे यांनीही काही मुद्दय़ांवर गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन दिले.
ही समिती येत्या २६ डिसेंबपर्यंत त्यांच्या शिफारसी सादर करणार आहे. राजीव गांधी तंत्रज्ञान योजना नागपूरचे प्रमुख डॉ. प्रकाश डोळस यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद आयोजित करण्यात आली.
विशेष म्हणजे गुडगाव, दिल्ली येथून बांबू कार्यकर्ता रामकृष्णण खास या परिषदेत सहभागी होण्यासाठी आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा