बांबू कलेच्या माध्यमातून अत्यंत गरिबी आणि प्रतिकूल परिस्थितीत महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणाऱ्या चंद्रपूरच्या मीनाक्षी मुकेश वाळके यांना लंडनच्या इन्स्पायरिंग इंडियन वुमनतर्फे यंदाचा ‘आयआयडब्ल्यू शी इन्स्पायर्स अवॉर्ड’ जाहीर झाला आहे. ‘द बांबू लेडी ऑफ महाराष्ट्र’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मीनाक्षीचा हा दुसरा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. यापूर्वी, तिला कॅनडाच्या इंडो-कॅनेडियन आर्ट्स अँड कल्चरल इनिशिएटिव्हचा “वुमन हिरो” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
हेही वाचा >>> चंद्रपूर : काळे झेंडे दाखवून रेल्वे मंत्रालयाचा निषेध, सेवाग्राम एक्स्प्रेस व पुण्यासाठी रेल्वे सुरू करण्याची मागणी
१५ मार्च रोजी इंग्लंडमधील ‘हाऊस ऑफ कॉमन्स’च्या परिसरात पुरस्कार वितरण सोहळा होणार असून या सोहळ्यात मीनाक्षी वाळके यांच्या प्रेरक कार्याचा चित्रफितही दाखवण्यात येणार असल्याची माहिती रश्मी मिश्रा यांनी दिली. या पुरस्कारांच्या ज्युरीमध्ये इंग्लंडचे संसद सदस्य आणि जागतिक कीर्तीच्या काही भारतीय दिग्गजांचा समावेश होता. २०१८ मध्ये, मीनाक्षीने दहा बाय तेरा भाड्याच्या घरातून “अभिसार इनोव्हेटिव्ह” हा सामाजिक गृहनिर्माण उपक्रम सुरू केला. तिच्या ६ वर्षांच्या मुलाची काळजी घेत सुमारे १००० महिलांना बांबू कला शिकवली. उद्योगाच्या दृष्टीनेही तिने युरोपातील ५ देशांमध्ये निर्यात करून स्वत:ला सिद्ध केले. मीनाक्षीने बांबूच्या रचनेचे विविध प्रयोग यशस्वी केले आहे. बांबू ‘क्यूआर कोड स्कॅनर’, ‘फ्रेंडशिप बँड’, मुकुट, मंगल तोरण हे तिचे प्रयोग लोकप्रिय होते. ‘बांबू राखी’ साठी तिला जागतिक स्तरावर मोठी लोकप्रियता मिळाली आहे.