मध्यवर्ती कारागृहाचा अजब कारभार
मुख्य वैद्यकीय अधिकारी पदावर नियुक्ती झालेल्या ‘एमबीबीएस’ पदवीप्राप्त डॉक्टरला डावलून एका ‘बीएएमएस’ पदवीप्राप्त डॉक्टरकडे मुख्य वैद्यकीय अधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचा अजब प्रकार नागपूर मध्यवर्ती कारागृहात समोर आला आहे.
कारागृहात ‘एमबीबीएस’ डॉक्टरच मुख्य वैद्यकीय अधिकारी पदावर असतील, असे कारागृह अधिनियमात स्पष्ट नमूद आहे. त्या नियमानुसार नागपूर मध्यवर्ती कारागृहात एक ‘एमबीबीएस’ आणि दोन ‘बीएएमएस’ पदवीप्राप्त डॉक्टरांची पदे असून तीनही पदे भरलेली आहेत. मध्यवर्ती कारागृहात २ हजारांवर कैदी असून त्यांच्या आरोग्याची जबाबदारी या तीन डॉक्टरांच्या खांद्यावर आहे. डॉ. विनोद मडावी हे एमबीबीएस असून त्यांची १७ जुलै २०१५ ला नागपूर जिल्हा परिषदेतून नागपूर मध्यवर्ती कारागृहात बदली करण्यात आली.
त्यापूर्वी कारागृहात एमबीबीएस पदवीप्राप्त वैद्यकीय अधिकारी नसल्याने मुख्य वैद्यकीय अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार विनोद तिवारी यांच्याकडे सोपवण्यात आला होता, परंतु एमबीबीएस पदवीप्राप्त अधिकारी प्राप्त होताच मुख्य वैद्यकीय अधिकारी पदाची धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात येणे आवश्यक होते. मात्र, नागपूर मध्यवर्ती कारागृहात तसे झाले नाही.
आजतागायत नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे मुख्य वैद्यकीय अधिकारीपद डॉ. विनोद तिवारी यांच्याकडेच आहे. यापूर्वी डॉ. तिवारी हे अनेक वर्षे निलंबितही होते. त्यासंदर्भात दुसरे बीएएमएस वैद्यकीय अधिकारी डॉ. पी.टी. डांगोरे यांनी कारागृहाचे अधीक्षक योगेश देसाई यांना निवेदन देऊन एमबीबीएस असलेल्या डॉ. विनोद मडावी यांच्याकडे मुख्य वैद्यकीय अधिकारी पदाचा कार्यभार सोपवण्याची विनंती केली होती, परंतु अद्यापही त्या निवेदनाची दखल घेण्यात आली नसल्याची माहिती आहे.
प्रतिक्रिया देण्यास अधीक्षकांचा नकार
यासंदर्भात नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक योगेश देसाई यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.