बुलढाणा : उत्सवांचा पवित्र मास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावण मासामध्ये केळीचे भाव वधारले आहे. यामुळे लाखो नागरिक प्रामुख्याने भाविकांना या गोड व पौष्टिक फळासाठी कडसर भुर्दंड सोसावा लागत आहे.
श्रावण मास म्हणजे उत्सव, व्रत वैकल्याचा काळ असतो. वर्षभर उपवास न करणारे श्रावण सोमवार व शनिवारी उपवास करतात.अनेक जण महिनाभर एक वेळचे भोजन करून उपवास करतात. काही निस्सीम भक्त तर केवळ फलाहार करून उपवास करतात. त्यामुळे श्रावण मासात फळांना प्रामुख्याने केळीला मागणी असते. यापरिनामी केळीचे दर सध्या वधारले आहे. ऑगस्टच्या पहिल्या पंधरवाड्याच्या तुलनेत दुसऱ्या पंधरवाड्यात डझनच्या दरात वाढ झाली आहे. सध्या चांगल्या प्रतीच्या केळीचा भाव ५० रुपये, मध्यम प्रतीचा ४० रुपये डझन भाव आहे. साधारण प्रतीच्या मालाची ३० रूपये दराने विक्री होत आहे. मोताळा तालुक्यातील तरोडा या गावातील मोठ्या आकाराच्या व विशिष्ट चवीच्या केळी चे दर यापेक्षा जास्त आहे. मात्र तेथून बुलढाण्यात होणारी आवक मंदावली आहे.
हेही वाचा… उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन मागे
बऱ्हाणपूर बेल्ट
जिल्ह्यातील मोताळा, मलकापूर, नांदुरा या तालुक्यात केळीच्या बागा आहे. याशिवाय सीमावर्ती भागातील बऱ्हाणपूर भाग केळीचा पट्टा म्हणून परिचित आहे. सध्या या भागातूनच बुलढाणा शहरात केळीची आवक होत आहे. जिल्हा मुख्यालयी फळांचे पाच ठोक विक्रेते आहे. त्यांच्याकडून शहर व तालुक्यात केळीचे वितरण करण्यात येत असल्याची माहिती जाणकारांनी दिली. श्राद्ध काळ वगळता गणेश उत्सव, ऑक्टोबर मध्ये येणाऱ्या घट स्थापना दरम्यान केळीचे दर उच्चांक गाठण्याची शक्यता या सूत्रांनी बोलून दाखविली.