लोकसत्ता टीम
भंडारा : ग्राहकांची फसवणूक आणि सदनिका विक्रीच्या माध्यमातून गैरव्यवहार करण्याचा प्रकार शहरातील एका माजी नगरसेवकाच्या अंगलट आले असून जिल्हा ग्राहक मंचाच्या आदेशानुसार या माजी नगरसेवकाला तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे तक्रारदारास जवळपास दोन कोटी रुपये देण्याचे आदेश ग्राहक मंचाने दिले आहेत. तर याच माजी नगरसेवकास अशाच एका प्रकरणात ग्राहक मंचाने तीन वर्षाची शिक्षा सुनावल्याचीही माहिती आहे. नितीन रामचंद्र धकाते (३६, रा. शास्त्री नगर, भंडारा) असे माजी नगरसेवकाचे नाव आहे.
भंडारा नगर परिषदेचे माजी नगरसेवकाने खोकरला भागात साई वात्सल्य अपार्टमेंट निर्मितीचा घाट घातला होता. एका अपार्टमेंट मध्ये नऊ सदनिका तयार करण्याची परवानगी असतानाही बारा सदनिका तयार करून त्या १४ लोकांना विकण्याचा अनोखा प्रताप या माजी नगरसेवकाने केला. म्हणजेच एकच फ्लॅट दोन व्यक्तींना विकण्याचा प्रयोगही या ठिकाणी झाला. दरम्यान, सोळा वर्षांपूर्वी सुरू झालेले हे अपार्टमेंटचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. सदनिका विकत घेण्यासाठी पैसे देणाऱ्या ग्राहकांची फसवणूक झाल्याचे लक्षात येतात ग्राहकांनी माजी नगरसेवकाकडे पैसे परत देण्यासंदर्भात तगादा लावला.
मात्र, पैसे परत न मिळाल्याने अखेर या लोकांनी जिल्हा ग्राहक मंचात प्रकरण दाखल केले. काहींनी वैयक्तिक तर काहींनी सामूहिक स्वरूपात प्रकरणे दाखल केली असून जवळपास चार प्रकरणे जिल्हा ग्राहक मंचात माजी नगरसेवक यांचे विरोधात असल्याचे समजते. यातील सुमित कपूर यांच्या प्रकरणात माजी नगरसेवकाकडे यांना तीन वर्षाची शिक्षा झाल्याची ही माहिती असून यासंदर्भात जानेवारी २०२३ रोजी जिल्हा ग्राहक मंचाने आदेश पारित केले आहेत. मात्र, पोलिसांकडून अटकेच्या संदर्भात कारवाई करण्याच्या दृष्टीने टाळाटाळ केली जात असल्याने ग्राहक मंचानेही पोलिसांच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढल्याचे समजते.
अन्य १४ व्यक्तींच्या प्रकरणांमध्ये जिल्हा ग्राहक मंचाने १८ टक्के व्याजासहित जवळपास दोन कोटी रुपयांची रक्कम माजी नगरसेवक यांनी ग्राहकांना परत करावी अशा आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशाचे पालन न केल्यामुळे न्यायालयाने माजी नगरसेवक यांचे विरोधात अटक वॉरंट काढायला होता. २३जुलै रोजी माजी नगरसेवक यांना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. ३१ जुलै रोजी परत न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र ,त्यावेळी माजी नगरसेवक यांनी मंचाच्या आदेशाप्रमाणे पैसे भरण्यास असमर्थता दर्शविल्याने आता ५ ऑगस्ट पर्यंत माजी नगरसेवक यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
आणखी वाचा-शिवरायांची जयंती आता आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-खास’मध्ये दरवर्षी होणार…!
पोलिसांकडून वेळकाढूपणाचा प्रकार?
हातेल विरुद्ध नितीन धकाते आणि आशिष विरुद्ध नितीन धकाते अशा तीन प्रकरणांमध्ये केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी धकाते यांची रवानगी तुरुंगात झाली असल्याची माहिती या प्रकरणातील तक्रारकर त्यांचे वकील संतोष सिंह सुखदेवसिंह चौहान यांनी दिली. धकाते यांच्या प्रकरणात पोलिसही संशयास्पद भूमिकेत असून एका प्रकरणात शिक्षा झाली असतानाही ते फरार किंवा घराला कुलूप असल्याचे कारण सांगून वेळकाढूपणाचा प्रकार पोलिसांकडून होत असल्याचे वकिलांनी म्हटले आहे.