नागपूर: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा महासंघ (इंडियन बँक असोसिएशन) आणि बँक कर्मचारी संघटनांचा महासंघ (युनायटेड फोरम बँंक युनियन्स) यांच्यात दर पाच वर्षाने होणारा वेतनवाढ करार यंदा ठरलेल्या तारखेऐवजी (११मार्च) प्रथमच तीन दिवस आधी (८ मार्च) होत असल्याने व त्यासाठी पूर्वीचे स्थळही (चेन्नईऐवजी मुंबई) बदलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागण्याच्या शक्यतेमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा बँक कर्मचाऱ्यांमध्ये आहे.
दर पाच वर्षाने बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत इंडियन बँक असोसिएशन व युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांच्यात करार केला जातो. ठरल्यानुसार हा करार ११ मार्चला चेन्नई येथे होणार होता. परंतु इंडियन बँक असोसिएशनने अचानक काहीही कारण न देता कराराची तारीख बदलून ती ८ मार्च केली. आता हा मुंबईत होणार आहे. विशेष म्हणजे ८ मार्चला महाशिवरात्रीची सुटी आहे. प्रथमच ठरलेल्या तारखेपूर्वी हा करार होत आहे.
हेही वाचा – संस्कृत ही २०४७पर्यंत पहिल्या पसंतीची भाषा व्हावी!
कर्मचाऱ्यांच्यावतीने वाटाघाटी करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे कर्मचारी संघटनेचे नेते सी. एच. व्यंकटचलम यांच्यावर चेन्नई येथे उपचार सुरू आहे. ते या करारावर कर्मचारी संघटनेच्यावतीने स्वाक्षरी करणार होते, त्यामुळे करारासाठी चेन्नईची निवड करण्यात आली होती. मात्र आता मुंबईत करार होणार आहे. तसे पत्र बँक असोसिएशनने कर्मचारी संघटनेच्या महासंघाला पाठवले आहे. अचानक झालेल्या या बदलाबाबत बँक कर्मचाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. दहा तारखेनंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या शक्यतेने हा बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
हेही वाचा – लोकजागर: मोदी, शेती आणि यवतमाळ!
आधीच्या कराराची मुदत ३१ ऑक्टोबर २०२२ ला संपली असल्याने वेतनवाढीचा नवा करार पूर्वलक्षी प्रभावाने १ नोव्हेंबर २०२२ पासून लागू होणार असून तो पुढील पाच वर्षासाठी लागू राहील. त्यानुसार १७ टक्के वेतनवाढ आणि भत्त्यात वाढ केली जाईल. याचा फायदा ९ लाख कर्मचाऱ्यांसह ३.८ लाख अधिकाऱ्यांना मिळणार आहे.