महेश बोकडे, लोकसत्ता
नागपूर : गेल्या पाच वर्षांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या वेगवेगळय़ा भागातील ६७ शाखा बंद झाल्या आहेत. बँकेकडे सध्या ग्राहकांनी दावा न केलेल्या ५२१ कोटी ५९ लाख ५८ हजार १४ रुपयांच्या ठेवी असल्याचे माहिती अधिकारातून पुढे आले आहे.
सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांना मिळवलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च २०२२ रोजीच्या आकडेवारीनुसार, बँक ऑफ महाराष्ट्रच्या २ हजार २२ शाखा सुरू असून तेथे १२ हजार ८२५ कर्मचारी कार्यरत आहेत. या शाखांमध्ये ३० एप्रिल २०२२ पर्यंत ८ लाख ६७ हजार ८७७ खात्यांतील रकमेवर दहा वर्षांहून अधिक काळापासून ग्राहकांनी दावा केला नाही. त्यामुळे या खात्यातील ५२१ कोटी ५९ लाख ५८ हजार १४ रुपयांची रक्कम ही दावा नसलेल्या ठेवीत (अनक्लेम डिपॉझिट) परावर्तीत केली गेली. बँकेत गेल्या पाच वर्षांत १४ सायबर गुन्हे घडले असून ही रक्कम ४ कोटी ३८ लाख ७८ हजार ३८८ रुपये आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये बँकेचे १५२ एटीएम बंद झाले आहेत. २७ मे २०२२ रोजी बँकेचे सर्वत्र २ हजार १४५ एटीएम असल्याचेही माहितीच्या अधिकारात कळवण्यात आले आहे.
घोटाळय़ाची माहिती देण्यास नकार
कोलारकर यांनी गेल्या वर्षभरात बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये किती घोटाळे झाले, त्याची रक्कम किती, त्यात किती कर्मचारी गुंतले होते, याबाबतची माहितीही मागितली होती. परंतु ही गोपनीय माहिती असल्याने देता येणार नाही, असे बँकेने स्पष्ट केले. रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया ही माहिती देत असतानाही बँक ऑफ महाराष्ट्र मात्र ती गोपनीय असल्याचे कारण देत नाकारत असल्यामुळे कोलारकर यांनी आश्चर्य व्यक्त केले.
दावा नसलेली रक्कम म्हणजे काय?
खातेदार दगावल्यास वारसदाराने बँकेशी दहा वर्षे संपर्क न करणे, खातेदार इतरत्र स्थानांतरित झाल्यावर सलग दहा वर्षे बँकेचा त्याच्याशी संपर्क न झाल्यास हे खाते दावा नसलेल्या ठेवीत परावर्तीत केले जाते. कालांतराने ही रक्कम रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाकडे वळती होते. दरम्यान, व्यक्ती बँकेत परत आल्यास त्याला विशिष्ट प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा रक्कम देता येते.
‘मुद्रा लोन’चे थकीत कर्ज ७६३ कोटींवर
बँक ऑफ महाराष्ट्रने ४ लाख ८१ हजार ५९० खातेधारकांना २ हजार ७०४ कोटींचे ‘मुद्रा लोन’ दिले. यापैकी ८५ हजार ६९१ खातेधारकांनी हे कर्ज थकवले. ही थकवलेली (नॉन परफॉर्मिग अॅसेट) कर्जाची रक्कम ७६३ कोटी रुपये आहे.
‘‘ बँकेतील सॉफ्टवेअरनुसार स्वयंचलीत पद्धतीने व्यवहार नसलेल्या व बँकेशी संपर्क न केलेल्या ग्राहकांची ५२१.५९ कोटींची रक्कम दावा नसलेल्या ठेवीत परावर्तीत झाली आहे. ही माहिती संबंधित विभागाकडून आली आहे. ही रक्कम कालांतराने रिझर्व बँक ऑफ इंडियात वळवली जाते. संबंधित व्यक्ती परतल्यावर ही रक्कम त्यांना परतही मिळते.’’
– गौरव त्यागी, केंद्रीय जनसूचना अधिकारी, बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे.